HOME   लातूर न्यूज

मनपा कराच्या विरोधात प्रकाश पाठकांची हायकोर्टात याचिका

दोन आठवड्यात म्हणणे मांडण्याचे महापालिकेला आदेश


मनपा कराच्या विरोधात प्रकाश पाठकांची हायकोर्टात याचिका

लातूर: महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी अधिकार नसतानाही करवाढ केली. ही करवाढ पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली. ही करवाढ जाचक असल्याचे सांगत करवाढीच्या विरोधात भाजपाचे स्वीकृत नगरसेवक प्रकाश पाठक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी घेऊन न्यायालयाने याप्रकरणी महापालिकेने दोन आठवड्यांच्या आत आपले म्हणणे सादर करावे असे आदेश दिले असल्याची माहिती प्रकाश पाठक यांनी दिली.
महापालिकेच्या तत्कालीन आयुक्तांनी २०१७-१८ या वर्षाची करवाढ नोव्हेंबर महिन्यात जाहीर केली. आयुक्तांनी ही करवाढ पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच ०१ एप्रिल पासून लागू केली. वास्तवात कलम १२७ प्रमाणे कर लावण्याचा अधिकार फक्त महापालिका आहे सभागृहाला निर्णय घेऊन कर वाढ करावी लागते. पालिकेच्या आयुक्तांना वाढ करण्याचा कसलाही अधिकार नाही. तसेच करवाढ करावयाची असेल तर त्यासंबंधीचा निर्णय २० फेब्रुवारी पूर्वी घ्यावा लागतो आणि नवी कर वाढ ०१ एप्रिल पासून लागू करावी लागते. परंतु तत्कालीन आयुक्तांनी बेकायदेशीरपणे काम करुन करवाढ केली ही जाचक आणि बेकायदेशीर करवाढ रद्द करावी अशी मागणी करणारी जनहित याचिका प्रकाश पाठक यांनी खंडपीठात दाखल केली होती. न्या. बोर्डे व न्या. ढवळे यांच्यासमोर सोमवारी या याचिकेची सुनावणी झाली. त्यावेळी यासंदर्भात महापालिकेने दोन आठवड्यात आपले म्हणणे सादर करावे असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी ॲड. शरद नातू यांनी प्रकाश पाठक यांची बाजू न्यायालयासमोर मांडली.


Comments

Top