HOME   लातूर न्यूज

लातूर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी ३१.५० कोटींचा निधी

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचा पाठपुरावा


लातूर जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी ३१.५० कोटींचा निधी

लातूर: जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत लातूर जिल्ह्याला ३१ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
लातूर जिल्ह्यात गोरगरीब नागरिकांना आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध व्हाव्यात यासाठी आरोग्य सुविधा अधिक बळकट व्हावी असे पालकमंत्री निलंगेकर यांचे धोरण आहे. यासाठी एका कार्यक्रमानिमित्त केंद्रीय आरोग्य मंत्री लातूरात आले असता पालकमंत्र्यांनी त्यांना निवेदन देऊन आरोग्य सुविधांसाठी निधीची मागणी केली होती. त्याला मंजुरी मिळाली असून जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निवासस्थानासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील किनगाव, उजनी व मदनसुरी येथे नव्या प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी करण्यात आली होती. या तिन्ही केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी प्रत्येकी तीन कोटी ७७ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. कव्हा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निवासस्थानासाठी पाच कोटी ६० लाख रुपये मंजूर झाले आहेत. नळेगाव, वलांडी व पानचिंचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचारी निवासस्थानासाठी प्रत्येकी १ कोटी ८० लाख रुपयांना मंजुरी मिळाली आहे. हंडरगुळी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तीन कोटी ४१ लाख तर जवळगा पोमादेवी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या निवासस्थानासाठी चार कोटी रुपये निधी मिळणार आहे. जिल्हा औषध भांडारासाठी ८२ लाख रुपये तर विभागीय औषध भांडारासाठी ९७ लाख रुपये असा एकूण ३१ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पाठपुरावा करून हा निधी मंजूर करून घेतला आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक बळकट होणार आहेत. या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सुसज्ज इमारती उभ्या राहणार आहेत.


Comments

Top