HOME   लातूर न्यूज

अशोकरावांना आमदार म्हणून मुंबईला न्यायचे आहे

निलंग्याला येत राहणार, पालकमंत्र्यांनी आजवर काय केल?- आ. अमित देशमुख


अशोकरावांना आमदार म्हणून मुंबईला न्यायचे आहे

निलंगा: लातूर जिल्ह्याला जिल्ह्याचाच पालकमंत्री मिळून दीड वर्ष झाले मात्र एकही नवी योजना, उद्योग किंवा एखादे नवीन कार्यालय येथे सुरु झाले नाही. रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे. शासकीय कार्यालयात फक्त देण्या-घेण्याची भाषा सुरु आहे. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या करण्याचा विचार करु लागले आहेत. आता हे सर्व सहन करण्यापलीकडचे झाले आहे. हे चित्र बदलायचे असेल तर काँग्रेसजनांना एकत्र यावेच लागेल. आज मी निलंगा तालुक्यात आलोय, येथून पुढेही येतच राहणार. तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणीला मी धावून येणार आहे असे प्रतिपादन आ. अमित देशमुख यांनी केले. ते राठोडा येथे बोलत होते. निवडणुका जिंकल्या म्हणजे सर्व काही घडते असे नाही. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. लोक एकवेळ फसतात, पुन्हा त्यांना पुन्हा-पुन्हा फसवणे शक्य नसते. याचे भान सत्ताधाऱ्यांना नाही. आता लोक जागृत झाले आहेत. निलंगा भागात अशोकराव पाटील निलंगेकर यांनी जनतेचा हा असंतोष एकत्र करावा, आम्ही त्यांच्या मदतीला आहोत. त्यांना निलंग्यातून आमदार म्हणून त्यांना मुंबईला नेण्याची तयारी आजच्या राठोडा येथील सरपंचांच्या सत्कार समारंभापासून सुरु झाली आहे, असेही आमदार अमित देशमुख यांनी म्हटले तेव्हा उपस्थितांनी जोरदार दाद दिली.
मंगळवारी सायंकाळी निलंगा तालुक्यातील राठोडा येथे पंचक्रोशीतील नूतन सरपंच व उपसरपंचाच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार अमित देशमुख बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर हे होते. यावेळी अॅड. विक्रम हिप्परकर, माजी जि.प.अध्यक्ष पंडितराव धुमाळ, तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील, जलिलमियाँ देशमुख, मोईज शेख, समद पटेल, प्रमोद बरुरे, सुरेंद्र धुमाळ, महेश देशमुख, बब्रुवान सोमवंशी, दगडूसाहेब पडिले, सुरेश दरेकर, दयानंद चोपणे, लाला पटेल, प्रज्ञासागर वाघमारे आदी उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय समारोप करताना अशोकराव पाटील निलंगेकर यांनी सांगितले की, निवडणुकीच्यावेळी पंतप्रधान मोदी “काँग्रेसला ६० वर्षे दिली, आता आम्हाला ६० महिने सत्ता द्या,” असे म्हणत होते. सत्ता मिळून आता ४० महिने झाली, तरी त्यांनी देशाला काहीही दिले नाही. संभाजी पाटील यांना जिल्ह्याचे पालकमंत्री होऊन दोन वर्षे झाली, त्यांनी मतदारसंघासाठी काय दिले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. सत्तेत नव्हते तेव्हा हेच संभाजीराव खुर्चीच्या लिलावाची भाषा करीत होते. आता त्यांच्याच खुर्चीच्या लिलावाची वेळ आली आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.


Comments

Top