HOME   लातूर न्यूज

शेतमाल तारण योजना आता जिल्हाभरासाठी

आजवर आला ०४ हजार क्विंटल शेतमाल, योजनेची व्याप्ती वाढवली


शेतमाल तारण योजना आता जिल्हाभरासाठी

लातूर: शेतकर्‍यांसाठी राबविण्यात येणारी शेतमाल तारण योजना आता जिल्हाभरातील शेतकर्‍यांसाठी उपलब्ध असून जिल्हयातील कोणत्याही गावातील शेतकर्‍यांना त्यात आपला माल ठेवता येणार आहे. शेतकर्‍यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितभाई शहा, उपसभापती मनोज पाटील व सचिव मधुकर गुंजकर यांनी केले आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने मागील महिन्यापासून शेतमाल तारण योजना सुरु करण्यात आली. परंतू आतापर्यंत ही योजना केवळ लातूर तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी होती. परंतू आता ती जिल्हाभरातील शेतकर्‍यांसाठी लागू करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत आतापर्यंत ६० शेतकर्‍यांनी आपला माल ठेवला आहे. जवळपास ०४ हजार क्विंटल शेतमाल ठेवण्यात आला असून शेतकर्‍यांना ७५ लाख रुपये या योजनेअंतर्गत देण्यात आले आहेत. या योजनेत आता जिल्हयातील सर्वच शेतकर्‍यांना सहभागी होता येणार आहे. त्यामुळे जिल्हयातील शेतकर्‍यांनी आपला शेतमाल हमीभावापेक्षा कमी दराने विक्री करु नये. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरु केलेल्या शेतमाल तारण योजनेत सहभाग नोंदवून आपली आर्थिक गरज भागवावी. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही व भविष्यात अधिक दर मिळू शकेल असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


Comments

Top