HOME   लातूर न्यूज

सिद्धेश्वरांची झेंडा मिरवणूक, देखाव्यांनी उत्साह


सिद्धेश्वरांची झेंडा मिरवणूक, देखाव्यांनी उत्साह

लातूर: ग्रामदैवत सिध्देश्‍वर व रत्नेश्‍वर देवस्थानच्या यात्रेच्या पहिल्याच दिवशी मानाच्या काठयांची व सिध्देश्‍वर व रत्नेश्‍वर देवस्थानच्या ध्वजाची मिरवणूक प्रथेप्रमाणे काढण्यात आली. या झेंडा मिरवणुकीने शहरवासिय व भक्तांच्या उत्साहाला उधाण आले. झेंडा मिरवणूकीत सहभागी झालेल्या विविध देखाव्यांनी लक्ष वेधले. त्सवाच्या पहिल्या दिवशी झेंडा मिरवणूक काढली जाते. सोलापूर येथील सिध्देश्‍वर देवस्थान प्रतिनिधींच्या मार्गदर्शनात ही झेंडा मिरवणूक संपन्न होते. गोजमगुंडे परिवार, झिपरे परिवार व रामलिंगेश्‍वर देवस्थानच्या झेंडासह सिध्देश्‍वर देवस्थानचा ध्वज या मिरवणूकीत सहभागी असतो. बाजार समिती परिसरातील गौरीशंकर मंदिरापासून मिरवणूकीला प्रारंभ झाला. तत्पूर्वी गोजमगुंडे यांच्या अस्मिता निवासस्थानी काठयांचे विधीवत पुजन करण्यात आले. त्यानंतर बाजार समिती परिसरातून गोलाई मार्गे ही मिरवणूक सिध्देश्‍वर देवस्थानच्या दिशेने रवाना झाली. फटाक्यांच्या आतिषबाजीत बँड, ढोल पथक, धनगरी ढोल, यासह विविध भजनी मंडळे पारंपारिक वाद्य वाजवित मिरवणुकीत सहभागी झाले. विविध देखावेही मिरवणुकीत सादर करण्यात आले. संत, देव-देवता तसेच महापुरुषांच्या वेशभुषा केलेले चिमुकले मिरवणूकीत सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या अग्रभागी उंट व अश्‍व दल लक्ष वेधून घेत होते. गावभागातून मिरवणूक जात असताना शहरवासिय व भाविकभक्तांनी ठिक-ठिकाणी मानाच्या झेंडयाचे विधीवत पूजन केले. मिरवणुकीत सहभागी झालेल्याना पाणी व फळे वाटपाची सोय अनेक ठिकाणी करण्यात आली होती. या मिरवणुकीत देवस्थानचे विश्‍वस्त, बाजार समिती परिसरातील व्यापारी, मानकरी कुटुंब, यात्रा समितीचे पदाधिकारी यांच्यासह शहरातील नागरीक, भक्त मोठया संख्येने सहभागी झाले होते. सिध्देश्‍वर व रत्नेश्‍वर देवस्थानच्या झेंडा मिरवणुकीत स्वच्छतेचा जागर दिसून आला. हातात रिकामी पोती घेतलेले स्वयंसेवक मिरवणूक मार्गावरील कचरा उचलून पोत्यात भरत होते. हा कचरा नंतर घंटागाडीत टाकला जात होता.


Comments

Top