HOME   लातूर न्यूज

दहावीच्या विद्यार्थ्याची जाळून घेऊन आत्महत्या

‘स्कूल डे’ आला मुळावर, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा शिक्षकावर गुन्हा


दहावीच्या विद्यार्थ्याची जाळून घेऊन आत्महत्या

लातूर: येथील बसवणअप्पा वाले इंग्लिश स्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अमन अजय समुद्रे याने स्वतःच्या घरात बाथरूममध्ये अंगावर पेट्रोल टाकून जाळून घेऊन आत्महत्या केली. त्याला त्याच्या शिक्षकाने सर्वांसमोर अपमानित केल्यामुळे त्याने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे. संतोष आळंदकर असे या शिक्षकाचे नाव असून, त्याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील बसवणअप्पा वाले इंग्लिश स्कूलमध्ये १४ फेब्रुवारी रोजी ‘स्कूल डे’ साजरा करण्यात आला. त्या दिवशी अमन समुद्रे हा आपल्या मित्रांसह पांढरा पायजमा, भगवा शर्ट, केशरी फेटा घालून शाळेत गेला होता. त्याने काही घोषणाही दिल्या. त्यावरून शिक्षक संतोष आळंदकर त्याच्यासह त्याच्या मित्रांवर चांगलेच रागावले. अशा प्रकारचे कपडे घालून शाळेत येणे व घोषणाबाजी करणे चांगले नाही, असे म्हणत त्यांनी त्यांच्या डोक्यावरचे फेटे काढले. १५ फेब्रुवारी रोजी आळंदकर यांनी अमनला पुन्हा धमकी दिली की, प्रॅक्टीकलचे गुण माझ्या हातात आहेत. अमनला हा अपमान अमनला सहन झाला नाही. त्याने १६ फेब्रुवारी रोजी घरातील बाथरुममध्ये अंगावर पेट्रोल टाकून घेऊन स्वत:ला जाळून घेतले. दुसऱ्या दिवशी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकारामुळे पालकवर्गात संतापाची लाट उसळली. अमनचे पालक अजय शाहूराज समुद्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शिक्षक संतोष आळंदकर यांच्या विरोधात अमन यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक सौमित्र मुंढे करीत आहेत.


Comments

Top