HOME   लातूर न्यूज

अमित देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होतील- मणिकराव ठाकरे

सत्ता परिवर्तनासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावीच लागेल- प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण


अमित देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होतील- मणिकराव ठाकरे

लातूर: लातूर जिल्ह्यातील नेते चांगले आहेत, त्यामुळे येथे काँग्रेसचा समतेचा विचार रुजलेला आहे, नव्या पिढीने हा वारसा जपावा असे आवाहन विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी केले. आमदार अमित देशमुख यांनी लोकनेते विलासराव देशमुख यांचा लोकसेवेचा वारसा समर्थपणे पुढे चालविला आहे, थोडा वेळ लागेल परंतु त्यांना भविष्य खूप चांगले आहे, परिश्रम घ्या एक ना एक दिवस राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची संधी तुमच्याकडे चालून येईल असे ठाकरे यांनी म्हटले. ते कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. राज्यात आणि देशात राजकीय वातावरण बदलत आहे हे जरी खरे असले तरी सहजासहजी सत्ता परिवर्तन होणार नाही, या वस्तुस्थितीचे जाणीव ठेवत देश हिताविरुध्द काम करणारे हे सरकार काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकष्टा करीत लोकशाही मार्गाने उलथवून टाकावे, असे आवाहन प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, किशोर गजभिये, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित विलासराव देशमुख, आ.शरद रणपिसे, आमदार बस्वराज पाटील मुरुमकर, आमदार त्र्यंबक (नाना) भिसे, टी.पी.मुंडे, धिरज विलासराव देशमुख, अशोकराव पाटील निलंगेकर, अर्चनाताई पाटील चाकूरकर, माजी आमदार वैजनाथ शिंदे, शिवाजीराव पाटील कव्हेकर, लातूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अॅड.व्यंकट बेद्रे, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मोईज शेख, महिला जिल्हाध्यक्षा सुनिताताई आरळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
लोकांचे प्रश्न घेऊन सक्रिय व्हा - दिलीपराव देशमुख
सत्ता परिवर्तनाचा उद्देश ठेऊन नव्हे तर लोकांचे प्रश्न घेवून, सोडविण्यासाठी म्हणून सक्रीय व्हा, आपोआप परिवर्तनाची प्रक्रिया सुरु होईल, असे आवाहन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. फक्त इतिहास सांगितल्याने लोक आपल्याबरोबर येणार नाहीत, त्यांचे भविष्य घडविणारे कार्यक्रम घेवून आपणाला त्यांच्यासमोर जावे लागेल असे सांगताना ज्यांचा इतिहास चांगला आहे, तेच भविष्याचा वेध घेऊ शकतात असेही त्यांनी म्हटले.
नांदेड - मुंबई व्हाया लातूर……
प्रदेशाध्यक्षांनी लातूरच्या कार्यकर्त्यांकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, त्याची १०० टक्के पूर्तता होईल अशी ग्वाही आमदार अमित देशमुख यांनी यावेळी दिली. राज्यात परिवर्तनाची जी चळवळ प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी उभारली आहे, त्या चळवळीचा मार्ग नांदेड-मुंबई व्हाया लातूर असा ठेवावा, म्हणजे महाराष्ट्रात १०० टक्के परिवर्तन घडेल. यातून विधानभवनावर तर तिरंगा फडकेलच शिवाय या निमित्ताने लातूर लोकसभा मतदार संघातही परिवर्तन घडवले जाईल असा ठाम विश्वास आमदार अमित देशमुख यांनी व्यक्त केला. आमदार देशमुख यांची नांदेड-मुंबई व्हाया लातूर ही संकल्पना उचलून धरताना प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनीही नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला १०० टक्के यश मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न आणि सहकार्य केले जाईल असे आश्वासन यावेळी दिले.


Comments

Top