HOME   लातूर न्यूज

लाच प्रकरणी सश्रम कारावास अन दंड

२०१२ चं प्रकरण, न्यायालयानं ठोठावल्या एकाच वेळी दोन शिक्षा


लाच प्रकरणी सश्रम कारावास अन दंड

लातूर: २०१२ च्या ऑक्टोबर महिन्यात घेतलेल्या लाच प्रकरणाचा निकाल लागला असून वसंतराव नाईक विकास महामंडळाच्या कर्मचार्‍याला दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तक्रारदाराला अहमदपूरच्या महाराष्ट्र बॅंकेकडून तीन लाखांचे कर्ज मंजूर झाले होते. त्यापैकी बीज भांडवलासाठी वसंतराव नाईक विकास महामंडळाकडून २५ टक्के अर्थात ७५ हजार रुपये मंजूर झाले. त्याचा चेक देण्यासाठी अहमदपूरच्या वसंतराव नाईक विकास महामंडळ कार्यालयातील कार्यालयीन सहाय्यक संतोष विष्णू पवार यांनी तीन हजार रुपयांची मागणी केली. ही लाच स्विकारताना पवार यांना रंगेहात पकडण्यात आले होते. लातुरच्या शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यावरील खटला लातुरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात चालला. त्याचा निकाल लागला असून न्यायालयाने पवार यांना दोन वर्षे सश्रम कारावास आणि तीन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास चार महिने कारावास शिवाय दुसर्‍या एका कलमानुसार दोन वर्षे कारावास आणि पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. दोन्ही शिक्षा एकाच वेळी भोगायच्या आहेत. तत्कालीन पोलिस निरीक्षक जेआर भंडरवार यांनी या गुन्ह्याचा तपास केला होता. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता संतोष देशपांडे, कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलिस उप निरीक्षक एडी गायकवाड यांनी कामकाज पाहिले.


Comments

Top