HOME   लातूर न्यूज

केंद्र सरकारच्या पथकाकडून जिल्ह्यात ग्रामस्वराज्य अभियान


केंद्र सरकारच्या पथकाकडून जिल्ह्यात ग्रामस्वराज्य अभियान

उदगीर: राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत केंद्र शासनाचे एक पथक जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहे. या पथकाने बुधवारी उदगीर तालुक्यातील नागलगाव, कासराळ व हंगरगा या ग्रामपंचायतींची पाहणी करून तेथे केंद्र शासनाच्या विविध योजना पोहोचल्या की नाही, याची माहिती घेतली. या योजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपासून ५ मेपर्यंत केंद्र शासनाच्यावतीने राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान राबविण्यात येत आहे. हे अभियान संपूर्ण देशभर सुरू आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील विविध गावांत जावून तेथे केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध योजना किमपत पोहोचल्या आहेत, याची माहिती केंद्र सरकारचे प्रतिनिधी घेत आहेत. या पथकात खासदार डॉ. सुनील गायकवाड यांच्यासह केंद्र सरकारचे दिल्ली येथील सचिव चुन्नीलाल घोष, उपसचिव डी. बी. बोरसेकर, उदगीरचे उपविभागीय अधिकारी अरविंद लोखंडे, भाजपचे नेते बसवराज पाटील - कौळखेडकर, गटविकास अधिकारी संतोष राऊत, सरपंच अश्‍विनी वाघे यांच्यासह तालुक्यातील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे. केंद्र सरकारने मागील चार वर्षांच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये पंतप्रधान आवास योजना, जनधन योजना, उज्ज्वल्ला गॅस योजना, वृध्द पेन्शन योजना, आदिवासी विकास योजना, गरीबांना मोङ्गत विद्युत कनेक्शनची योजना आदी योजना ग्रामीण भागापर्यंत किती प्रभावीपणे राबल्या आहेत, याची माहिती हे पथक घेत आहे. ज्या भागात या योजना अद्यापपर्यंत पोहोचल्या नाहीत, त्यांना यात सामावून घेण्याच्या सूचना यावेळी डॉ. सुनील गायकवाड यांच्यासह केंद्र सरकारच्या चमुने केले आहे. ही समिती ५ मेपर्यंत जिल्ह्यातील विविध गावात जावून नागरिकांची विचारपूस करणार आहे.


Comments

Top