HOME   लातूर न्यूज

पावसाळयात विजेपासून धोका, सावधानता बाळगा

वीज तारा, झाडे कोसळणे, रोहित्रातील ठिणग्या, तारांमध्ये घर्षण शक्य


पावसाळयात विजेपासून धोका, सावधानता बाळगा

लातूर: पावसाळयाच्या प्रारंभी वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अधिक असते. शिवाय, वादळ, वाऱ्यामुळे झाडांच्या फांदया किंवा तत्सम वस्तु वीज तारांवर पडून त्या तुटून अपघात होण्याची शक्यता असते. अशा पार्श्वभूमीवर वीज ग्राहक व इतर नागरीकांनी सजगता बाळगून वीज अपघात टाळावे, असे आवाहन महावितरणच्या लातूर परिमंडलाचे नुतन मुख्य अभियंता आर.आर. कांबळे यानी केले आहे. पावसाळयात वादळामुळे वीज तारांमध्ये घर्षण होण्याची शक्यता अधिक मोठया प्रमाणात असते. त्यामुळे विजेच्या खांबावर, विदयुत तारा व रोहित्राच्या बॉक्समधून ठिणग्या पडतात. बऱ्याचदा ताराही तुटलेल्या असतात. कधी- कधी वीज यंत्रणेस त्याची माहिती प्राप्त न झाल्याने त्या कांही वेळा जीवंत (विदयुत प्रवाहित) असण्याची शक्यताही असते. त्यातूनही वीज अपघात होवून जिवीत व वित्त हानी होण्याची शक्यता नाकरता येत नाही. अशा प्रसंगात नागरिकांनी सजगता बाळगून महावितरणच्या नजिकच्या कार्यालयास किंवा चोवीस तास सेवारत असणाऱ्या महावितरणच्या 1912 / 18002333435 किंवा 18001023435 या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधून त्याबाबत माहिती कळवावी. असेही मुख्य अभियंता कांबळे यांनी कळविले आहे. पावसाने किंवा वादळाने तुटलेल्या विदयुत तारा , खांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलार, रोहित्राचे लोख्ंडी तारेचे कुंपन, फयुज बॉक्स तसेच शेतीपंपाचा स्वीचबॉक्स, घरातील ओलसर झालेली विदयुत उपकरणे आदी बाबींकडे दुर्लक्ष करु नये. सजगतेअभावी अपघाताची शक्यता अधिक असते. पावसाळयात विदयुत खांबाना किंवा स्टेवायरला गुरे- ढोरे बांधू नयेत. वीज तारांच्या खाली घर किंवा पाल, झोपडी बांधू नये. कपडे वाळत घालण्यासाठी तारांचा वापर करु नये. त्यासाठी वाळलेल्या लाकडांचा किंवा दोरीचाच सुरक्षितपणे वापर करावा. घरावर टिव्हीचा अँटेना किंवा डीशप्लेट विदयुत तारेपासून सुरक्षित अंतरावर असल्याची खात्री करुन तशी व्यवस्था करावी. विदयुत उपकरणांची दुरुस्ती करतांना किंवा हाताळणी करतांना मेनस्वीच बंद करावे. त्यादरम्यान पायात रबरी विदयुत रोधक चप्पल किंवा बूट वापरावा. वीज वायरची जोडणी करतांना ती अखंड असावी, तुकडया- तुकडयात असून नये, खंडित वायरची जोडणी अपरिहार्य असेल तर त्यावर इन्सुलेशन टेपचा वापर कटाक्षाने करावा, असेही मुख्य अभियंता आर. आर. कांबळे यांनी कळविले आहे.


Comments

Top