HOME   लातूर न्यूज

गुजरातच्या प्रभारीपदी पाशा पटेल यांची निवड

०२ जुलै रोजी पाशा पटेल गुजरात राज्याचा पहिला दौरा करणार


गुजरातच्या प्रभारीपदी पाशा पटेल यांची निवड

लातूर: राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांची भाजपा अखिल भारतीय किसान मोर्चाचे गुजरात प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाशा पटेल हे अखिल भारतीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. शेतकरी नेते म्हणून पाशा पटेल यांची ओळख आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची त्यांना जाण आहे. त्यामुळेच भाजपा अखिल भारतीय किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पद त्यांच्याकडे सोपवण्यात आलेले आहे. आता किसान मोर्चाचे गुजरात प्रभारी पद त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, महामंत्री रामलालजी यांच्या आदेशानुसार किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा वीरेंद्रसिंग मस्त यांनी पाशा पटेल यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही यात सिंहाचा वाटा आहे .
गुजरात राज्यात सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न तीव्र आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांनी निवडणुकीतही मतांच्या टक्केवारीवर परिणाम झाला. या पार्श्वभूमीवर पाशा पटेल यांची गुजरातचे प्रभारी म्हणून झालेली नियुक्ती महत्त्वपूर्ण मानली जात आहे. गुजरात राज्याचे माजी गृहमंत्री आणि सध्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री असणारे नितीन पटेल यांची महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभारी म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ०२ जुलै रोजी पाशा पटेल गुजरात राज्याचा पहिला दौरा करणार आहेत. या दौऱ्यात अहमदाबाद येथे आयोजित प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सहभागी होऊन ते मार्गदर्शन करणार आहेत . गुजरातमधील दंतेवाडा कृषी विद्यापीठाने जी ७ ही एरंडीची नवी जात शोधली आहे. याचे बियाणे वापरून मिळणारे उत्पादन व त्याचा दरही चांगला आहे. भारतात सध्या 13 लाख हेक्टर मध्ये एरंडीचा पेरा आहे. या माध्यमातून होणारे उत्पन्न चौपट वाढले तरी जागतिक पातळीवरील मागणी लक्षात घेता ते कमीच पडणार आहे. हे बियाणे तसेच शेतीसंदर्भातील विविध विषयांच्या अभ्यासासाठी विद्यापीठात होणाऱ्या बैठकीस पाशा पटेल उपस्थित राहणार आहेत. गुजरातच्या काही भागात भुईमुगाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. त्या भागास भेट देऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करताना त्यांना मार्गदर्शनही करणार आहेत.सर्वस्तरातून पाशा पटेल यांचे अभिनंदन होत आहे.


Comments

Top