HOME   लातूर न्यूज

प्रसिद्धीसाठी कॉंग्रेसकडून सभेवर बहिष्कार- तिरुके

कॉंग्रेसने सभागृहाचे पावित्र्य जपले नाही, हागणदारीमुक्तीला केला विरोध


प्रसिद्धीसाठी कॉंग्रेसकडून सभेवर बहिष्कार- तिरुके

लातूर: संपूर्ण जिल्हा हागणदारी मुक्त व्हावा या संदर्भात आज जिल्हा परिषदेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेल्या कॉंग्रेसने शेतकर्‍यांना देशोधडीला लावले आहे. एवढेच नव्हे तर संपूर्ण देशभरात अस्वच्छता निर्माण करण्याचे कामही त्यांच्याकडूनच झालेले आहे. त्यामुळेच स्वच्छ भारत, सुंदर भारत हि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची संकल्पना साकार करण्यासाठी लातूर जिल्हा परिषद ही कटीबध्द आहे. मात्र या विशेष सभेवर बहिष्कार घालून कॉंग्रेस केवळ प्रसिध्दीसाठीच काम करत असल्याचे स्पष्ट झाले असून भाजपा सिध्दीसाठीच कार्यरत असल्याचा दावा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी केला.
स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ सत्ता उपभोगलेल्या कॉंग्रेसने कधीच कोणती चांगली कामे केलेली नाहीत. एवढेच नव्हे तर त्यांच्याधोरणामुळेच शेतकरी देशोधडीला लागलेला आहे. त्याच बरोबर देशभर अस्वच्छता निर्माण करण्याचे काम कॉंग्रेस धोरणामुळेच झालेले असून शेतकर्‍यांचे हित साधण्यासह स्वच्छ भारत व सुंदर भारत ही संकल्पना राबविण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कार्यक्षम आहेत. स्वच्छ भारत सुंदर भारत ही संकल्पना लातूर जिल्हा हागणदारी मुक्त करुन साकारली जावी याकरिता लातूर जिल्हा परिषदेच्या वतीने विशेष सभेचे आयोजन केले होते. या सभेत ३१ डिसेंबर अखेर जिल्हा हागणदारीमुक्त कसा करता येईल यावर चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र विषय पत्रिकेवर नसलेल्यावर विषयांवर चर्चा घडवून आणून सभागृहात काळया फिती बांधत हागणदारीमुक्त जिल्हयाला कॉंग्रेस सदस्यांनी विरोध केला असल्याचे तिरुके यांनी सांगितले. लोकशाहीच्या मार्गाने सभागृहाचे कामकाज होणे अपेक्षित असताना केवळ स्टटंबाजीसाठी काहीतरी करणे हे कॉंग्रेसला न शोभणारे आहे. दिवंगत लोकनेत्यांनी लातूर जिल्हा परिषदेच्या सभागृहाचे पावित्र्य जपले होते याचे भान तरी राखण्याची गरज कॉंग्रेसवाल्यांना आवश्यक होते अशी टिकाही तिरुके यांनी केली आहे.


Comments

Top