HOME   लातूर न्यूज

ज्येष्ठ पत्रकाराच्या ‘बिनचेहर्‍यांच्या माणसाचं’ प्रकाशन

लेखक अतुल कुलकर्णी, अर्थमंत्र्यांनी केलं प्रकाशन


ज्येष्ठ पत्रकाराच्या ‘बिनचेहर्‍यांच्या माणसाचं’ प्रकाशन

लातूर: गुणवंती बेन ठक्कर स्वयंसेवी संस्थेमार्फत दयानंद सभागृहात आयोजित वरिष्ठ पत्रकार अतुल कुलकर्णी यांच्या ‘बिन चेहर्‍यांची माणसं’ या पुस्तकाच्या तिस-या आवृत्तीचे प्रकाशन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. यावेळी कामगारमंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, विवेकानंद संस्थेचे अध्यक्ष अशोक कुकडे, आमदार सुधाकर भालेराव, जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातुरे, महापौर सुरेश पवार, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुंबई लोकमतचे सह संपादक अतुल कुलकर्णी, सहकार विभागाचे विभागीय सह आयुक्त श्रीकांत देशमुख, उद्योजक अजय ठक्कर, सीपीएस संस्थेचे डॉ. गिरीष मैंदरकर आदिसह पदाधिकारी, अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वित्तमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, शासन लातूरसह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी प्रयत्नशील असून लातूर शहरात नाट्यगृह बांधणे, नियोजन समिती सभागृह बांधणे, व महापालिकेची नवीन इमारत बांधणे या कामांसाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
‘बिन चेहर्‍ची माणसं’ हे पुस्तक लेखकाच्या आंतरमनातून लिहलेले असून यातील प्रत्येक शब्द न शब्द एक नवीन विश्वास निर्माण करतो. तसेच ज्या सर्वसामान्य माणसांना कोणत्याच प्रकारचा चेहरा नसतो त्या माणसांचे भाव विश्व या पुस्तकातून निर्माण झालेले आहे. तसेच सामान्य माणसांचे जे स्वप्न असते ते पूर्ण करण्याचा प्रयत्न या पुस्तकातून झालेला दिसतो, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. हे पुस्तक अत्यंत सुंदर व अप्रतीम झालेले असून या पुस्तकाच्या २५ व्या आवृत्तीचे प्रकाशन लवकरच लातूरच्या नवीन नाट्यगृहात होईल असेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
बिन चेहर्‍याची माणसं या पुस्तकाच्या प्रकाशनाचे मनोगत व्यक्त करतांना कुलकर्णी यांनी या पुस्तकात लेख, चित्रे व कॅलीग्राफी असा वेगळा प्रयोग करण्यात आल्याचे सांगून हा भारतातील पहीलाच प्रयोग असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच लातूर शहरात नाट्यगृह उभारावे, महापालिकेची नवीन इमारत उभारावी, नियोजन समिती सभागृह उभारावे व सोलार वीज प्रकल्प स्थापन करावा या प्रमुख मागण्या त्यांनी वित्त मंत्र्याकडे यावेळी केल्या. यावेळी अशोक कुकडे व श्रीकांत देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गिरीष मैंदरकर यांनी केले तर आभार अजय ठक्कर यांनी मानले.


Comments

Top