HOME   टॉप स्टोरी

साई मार्गावर अपघात, ०७ जण जखमी, सर्वोपचारमध्ये उपचार

मॉर्निंग वॉक करणार्‍यांना वाचवताना ट्रकने दिली रिक्षाला धडक, पहाटेचा प्रकार


लातूर: लातूर जिल्ह्यात सुरु झालेले अपघातांची मालिका अद्यापही तशीच आहे. आज पहाटे साई मार्गावर झालेल्या अपघातात सातजण जखमी झाले. रिक्षाचालकासह सातजणांवर लातुरच्या शासकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सुदैवाने या अपघात कुणी दगावलं नाही. अपघात होताच १०८ क्रमांकाला कॉल करण्यात आला. रुग्णवाहिकाही तातडीने दाखल झाली. रिक्षातील चालक वगळता बाकी सहाजण महानगरपालिकेच्या कामासाठी निघाले होते. सर्वचजण नांदगावचे रहिवासी आहेत.
आज पहाटे पाचच्या सुमारास मध्यवर्ती कारागृहाच्या जवळ हा प्रकार घडला. रिक्षा लातुरकडे निघाली होती. ट्रक साईच्या दिशेने जात होता. वाटेत मॉर्निंग वॉक करणारे लोक समोर आल्याने त्यांना वाचवण्यासाठी ट्रक उजवीकडे वळवला गेला, त्याचवेळी समोरुन आलेल्या रिक्षाला जबर धडक बसली असे या भागातील रहिवासी पद्माकर बन यांनी सांगितले. जखमींमध्ये राम बनसोडे २९, माधव सातपुते ३०, जयशी दोनगहू ३०, संतोष दोनगहू २५, सुनिता कांबळे ३५, श्रीराम गायकवाड २५ आणि सुलोचना बल्लाळ ५० यांचा समावेश आहे. यातील तिघांना फ्रॅक्चर झाले आहे. अपघातातील ट्रक लातुरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. चालक फरार झाला आहे.
काही दिवसांपूर्वी लामजना मार्गावरील चलबुर्गाजवळ भीषण अपघात झाला होता. त्यानंतर अपघातांची मालिका सुरुच आहे. परवा केंद्र सरकारच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या रस्ते सुरक्षा समितीची बैठक खासदारांनी घेतली. यात अपघात प्रवण क्षेत्र आणि ब्लॅक स्पॉट्सची यादी जाहीर करण्यात आली. या ठिकाणांशिवाय अरुंद रस्ते असणारी अनेक ठिकाणे आहेत. त्यांचाही विचार केला असता तर असे अपघात होणार नाहीत. नवा रेणापूर नाका ते साई या मार्गावर नागझरी, साई, नांदगाव अशा अनेक गावातून ये-जा सुरु असते. शिवाय रेल्वे स्थानकावरुन येणार्‍या अवजड मालवाहू ट्रकही हाच रस्ता वापरतात. जेमतेम २० फुटांचा हा रस्ता रहदारीसाठी घातक ठरत आहे.


Comments

Top