HOME   टॉप स्टोरी

३२९ जोडप्यांचे मनोमिलन, घरटी फुलू लागली....

दुरावलेल्या जोडीदारांना पोलिसांनी आणलं एकत्र, कारवाईपेक्षा समझोता बरा!


नितीन भाले, लातूर: लग्नगाठी वरच ठरतात असं म्हणतात, पण त्या जितक्या पक्क्या तितक्याच नाजूकही असतात. कारण छोटे असो वा मोठे दुभंगायला वेळ लागत नाही. अशी दुभंगलेली मने पोलिसांकडे धाव घेतात तेव्हा, पोलिसी खाक्यात कारवाई न करता त्यांना समजावून सांगून एकत्र आणण्याची ‘कार्यवाही’ केली जाते. याला यशही येतं. भरकटलेली पाखरं परतात तेव्हा प्रत्येक दिवस दिवाळी घेऊन येतो! अशीच कामगिरी केली आहे लातूर पोलिसांनी. महिला तक्रार निवारण केंद्राच्या माध्यमातून. आज या सर्वांना एकत्र आणलं गेलं. ‘बहारो फुल बरसाओ मेरा महेबूब आया है’ हे सदाबहार गाणं सादर करुन पोलिस अधिक्षकांनी त्यांना ‘नांदते व्हा’ असा सुखाचा मंत्रही दिला.
लातुरच्या पोलिस अधीक्षक कार्यालयात खास शामियाना उभारुन आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. काही कारणांनी दुभंगलेले संसार एकत्र आणल्याचा हा आनंदोत्सव होता. ‘मनोमिलन’ या उपक्रमातून मागच्या वर्षी २०९ जोडप्यांना एकत्र आणलं गेलं. यंदा १२० संसार पुन्हा जोडण्यात यश आलं. योग्य वेळी पती पत्नीत समेट न घडल्यास त्याचे कुटुंबावर गंभीर परिणाम होतात. लातूर जिल्ह्यात या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी दिली. कुटुंबात पती पत्नीने लहान लहान गोष्टीकडे दुर्लक्ष केले पाहिजे. बदलत्या काळानुसार स्वत: मध्ये बदल करून अहंकार बाजुला ठेवल्यास समाधानी जीवन जगता येते, असे प्रतिपादन कामगार कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
समाजातील प्रत्येक मुलीच्या पाठीशी प्रशासन ठामपणे उभे आहे. पुरुषाने घर व काम वेगळे ठेवून आपला अहंकार ही दुर ठेवावा. तसेच आपल्या पत्नीशी मित्रत्वाचे नाते निर्माण केल्यास कुटुंबात आनंदी वातावरण राहील, असे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगितले. यावर्षी आजपर्यंत मनोमिलन झालेल्या १२० जोडप्यांचा पालकमंत्री निलंगेकर यांच्या हस्ते साडी व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच महिला तक्रार निवारण कक्षामार्फत एवढया मोठया प्रमाणावर तुटलेल्या संसार जोडण्यासाठी समुपदेशन केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कारही पालकमंत्री यांनी केला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अध्यक्ष मिलींद लातूरे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, पोलीस अधिक्षक शिवाजी राठोड, महिला व बालविकास अधिकारी वैभव सुर्यवंशी, राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य श्रीमती आशाताई भिसे, बालकल्याण समिती अध्यक्ष शिला दंडे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. जकीरा काझी, गटशिक्षणधिकारी तृप्ती अंधारे अदि मान्यवरासह मनोमिलन झालेले १२० जोडपे उपस्थित होते. पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी सूत्र संचालन केलं. बालाजी सोनटक्के यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं. पोलिस विभागातील कर्मचारी कार्यक्रमासाठी झटत होती. पोलिसांच्या प्रयत्नामुळे एकत्र आलेल्या शिल्पा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केलं. लातूर पोलिसांचे आभार मानले. व्यसनापासून दूर राहण्याचा संदेशही दिला.


Comments

Top