HOME   टॉप स्टोरी

अनेकांचे व्यवसाय साहित्य उधळून टाकले, लाखोंचे नुकसान

राजीव गांधी चौकातला प्रकार, काम तिघांचे अटक एकाला, नुकसान भरपाईची मागणी


लातूर: राजीव गांधी चौकात काल रात्री दीडच्या सुमारास तिघांनी छोट्या व्यावसायिकांचे साहित्य उधळून टाकले. चारचाकी हातगाडे गटारात पालथे केले, अनेकांच्या भाज्यांचे क्रेट्स गटारात पालथ्या केल्या. अनेकांच्या भाज्या आणि फळे रस्त्यावर फेकली. आज दिवसभर राजीव गांधी चौकात तणाव होता. दोषी व्यक्ती विश्रामगृहाच्या बाजुला असलेल्या पॅराडाईज हॉटेलात काम करतात. या हॉटेलसमोर हे छोटे व्यावसायिक दिवसभर ठिय्या मांडून बसले होते. विवेकानंद पोलीसांनी या प्रकरणी पवन बिराजदार याला ताब्यात घेतले आहे पण अद्याप गुन्हा ‘दाखल’ झालेला नाही. हा प्रकरण परस्पर ‘मिटवून’ घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. कायदेशीर कारवाई झाल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही अशी भिती असल्याने कुणीही लेखी तक्रार देण्यास तयार नाही असे विवेकानंद पोलिस चौकीचे निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी सांगितले. विवेकानंद चौकीचे अनेक पोलिस जवान घटनास्थळी तळ ठोकून आहेत. कुणीही तक्रार देत नसल्याने आरोपीला नोटीस देऊन त्याला सोडण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. या प्रकरणात अनेक माजी नगरसेवक हस्तक्षेप करीत असल्याने मामला अधिक गुंतागुंतीचा होत आहे. ज्या मुख्य गुन्हेगाराने हा प्रकार घडवला त्याला कुणीतरी एका भाजी विक्रेतीनं शिवी दिली होती असे बोलले जाते. मुख्य आरोपीला हा सारा विध्वंस करण्यात आणखी दोघांनी मदत केली होती पण त्या दोघांची नावे घेतली जात नाहीत.


Comments

Top