HOME   टॉप स्टोरी

विधानपरिषदेसाठी उद्या मतदान, सर्व तयारी पूर्ण

कर्नाटकचा परिणाम होणार? सगळ्यांनी लावली प्रतिष्ठा पणाला


विधानपरिषदेसाठी उद्या मतदान, सर्व तयारी पूर्ण

उस्मानाबाद : कर्नाटकच्या पार्श्वभूमीवर आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता लागली आहे. रमेश कराड यांचा नाट्यमय प्रवेश, नंतर त्यांना मिळालेली उमेदवारी आणि लगेच उमेदवारी काढून घेणं, त्या बदल्यात अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांना राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसनं पाठिंबा देणं यामुळे ही निवडणूक करमणुकीची, चिंतेची आणि आगामी राजकारणावर परिणाम करणारी ठरणार आहे. कुणी म्हणतं पंकजाताईंनी राष्ट्रवादीवर मात केली, कुणी म्हणतं राष्ट्रवादीनं वन टू वनचा गेम केला. निकालानंतरच याचा खुलासा होणार आहे.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उस्मानाबाद तथा लातूर तथा बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ २०१८ ची निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीमध्ये सुरेश रामचंद्र धस व अशोक हरिदास जगदाळे हे अंतिम उमेदवार असून या निवडणुकीचे मतदान २१ मे रोजी सकाळी ०८ ते दुपारी ०४ या वेळेमध्ये होणार आहे. उस्मानाबाद जिल्हयामध्ये एकूण २९१, लातूर जिल्हयामध्ये एकूण ३५३ व बीड जिल्ह्यामध्ये एकूण ३६१ मतदार आहेत. तालुका बीड व तालुका गेवराई वगळता सर्व तहसिल कार्यालये ही मतदान केंद्रे आहेत. उपविभागीय अधिकारी कार्यालय, बीड हे बीड तालुक्यातील मतदारांसाठी व गेवराई नगरपरिषद कार्यालय हे गेवराई तालुक्यातील मतदारांसाठी मतदान केंद्र आहे. सर्व उप‍ विभागीय अधिकारी हे झोनल अधिकारी असून तहसिलदार मतदान केंद्राध्यक्ष आहेत. १४ झोनल अधिकारी, २९ मतदान केंद्राध्यक्ष व १४५ मतदान अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच सर्व मतदान केंद्रांमध्ये मतदारांची ओळख पटविण्यासाठी स्थानिक प्राधिकारी संस्थांचे दोन कर्मचारी असे एकूण ५८ कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे.
प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. मतदान अधिकारी-कर्मचारी २० मे रोजी संबंधित मतदान केंद्रावर मतदान साहित्यासह दाखल होणार आहेत. मतदान प्रकियेचे सकाळी ०७ वाजल्यापासून मतपेटी सील करण्यापर्यंत अखंडीत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येणार आहे. या मतदानासाठी मतदारांना मतदान केंद्रामध्ये कोणत्या्ही प्रकारचे पेन, मोबाईल, टॅब, डिजीटल, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रीक संयंत्र घेवून जाण्यास प्रतिबंध असून या बाबीचा उल्लंघन केल्यास आयपीसी १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र ठरतील व मुद्येमाल जप्त करण्यात येईल. या मतदानामध्ये मतदान हे पसंतीक्रमांकानुसार असून केवळ आयोगामार्फत पुरविण्यात आलेल्या जांभळया रंगाच्या‍ मार्कर पेननेच मतदान नोंदवावयाचे आहे. आयोगामार्फत १९ मे रोजी प्राप्त झालेल्या मार्गदर्शनानुसार ०३ रेाजी जे मतदार अंतिम मतदारयादीत समाविष्ट होते त्या सर्व मतदारांना मतदान करण्याचा अधिकार असणार आहे. मतमोजणी २४ मे रोजी सकाळी ०८ वाजता तहसिल कार्यालय उस्मानाबाद येथे होणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यक त्या सर्व अधिकारी-कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी उस्मानाबाद तथा निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्ण गमे यांनी दिली आहे.


Comments

Top