HOME   टॉप स्टोरी

भाजप नगरसेवकांचा एक गट लवकरच बाहेर पडणार!

कॉंग्रेस नेत्यांचा कडाडून हल्ला, भाजपच्या जाहिरनाम्याचे वर्षश्राध्द, २० टक्केही कामे झाली नाहीत


लातूर: पालकमंत्री संभाजी पाटील यांच्या एकाधिकारशाहीला आणि पक्षातील गटबाजीला नगरसेवकांचा एक गट कंटाळला असून हा गट बाहेर पडणार असल्याचा दावा कॉंग्रेसचे नगरसेवक आणि माजी सभापती विक्रांत गोजमगुंडे यांनी पत्रकार परिषदेत केला. महापौर आणि उप महापौरांना एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या कामांचा कॉंग्रेसने जाहीर पंचनामा केला. मनपाने आजवर २० टक्केही कामे केली नाहीत, जनतेला वेठीस धरले असाही आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला.
भाजपाची ही वर्षपूर्ती नसून फसव्या आश्वासनांचं वर्षश्राद्ध आहे. मनपाच्या भाजपात मोठी अंतर्गत धूसफूस आहे, एक मोठा गट बाहेर पडणार आहे. याचा प्रत्यय विधानपरिषदेच्या निकालावरुन येईल. भाजप मतदारांनी आघाडीच्या उमेदवाराला मते दिल्याचे कळेलल, गंजगोलाईचा शतकपूर्ती कार्यक्रमही सत्ताधारी भाजपा करु शकले नाहीत, मोठा निधी आल्याची केवळ पोस्टरबाजी केली जाते, पण नवा निधी मिळवण्यात त्यांना पूर्ण अपयश आले आहे. असलेला निधी खर्च केला जात नाही, आमच्या काळातील मंजूर कामांची उदघाटने करण्यात सत्ताधारी मंडळी आघाडीवर आहे, यांनी वर्ष वाया घालवलं, लातुरकरांना पिवळ्या पाण्याची शिक्षा देऊन हे सगळेजण सहलीवर गेले, लातुरकरांच्या विश्वासास ते पात्र ठरु शकले नाहीत, त्यांनी नैतिकता पाळत राजीनामे द्यावेत, याच मंडळींनी गंजगोलाईत अतिक्रमणाच्या नावाखाली मनमानी केली. दबावाखाली काम न करणार्‍या आयुक्तांच्या बदल्या मात्र केल्या आसा आरोप गोजमगुंडे यांनी केला. विद्यमान भाजपाची महापालिका आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरली आहे असे कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख म्हणाले. मनपाच्या माध्यमातून भाजपने पन्नास टक्के तर सोडाच २० टक्केही कामे केली नाहीत असा आरोप अशोक गोविंदपूरकर यांनी केला. सिग्नल, पाणीपुरवठा, पथदिवे, कचरा नियोजन, अशा कामांत मनपाला कसलीही प्रगती करता आली नाही, न झालेल्या कामांचा हवाला देत विरोधी पक्षनेते दीपक सूळ यांनी कामांचा लेखाजोखाच मांडला. एकीकडं मोठमोठ्या गप्पा मारायच्या अन दुसरीकडं लोकांना वेठीस करण्याचं काम या लोकांनी केलं. चाळीस वर्षात झाली नाही इतकी मोठी करवाढ त्यांनी केली. सर्वसाधारण सभेत यावर पुनर्विचार करु असी सांगण्यात आले मात्र अजून सभेचा पत्ता नाही असे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यंकटराव बेद्रे म्हणाले.


Comments

Top