HOME   व्हिडिओ न्यूज

विष प्राशन करुन शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

जमीन गहाण ठेवली अन महामार्गात गेली, मावेजा गेला सावकराकडे


लातूर: आज लातुरच्या उपविभागीय कार्यालयात एका शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या शेतकर्‍यावर लातुरच्या खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
उजनी येथील शेतकरी नारायण देशमुख यांनी गावातल्याच एका सावकाराकडे बारा गुंठे जमीन गहाण ठेवली होती. काही दिवसांनी ही जमीन राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ साठी संपादीत करण्यात आली. सध्या या महामार्गात ज्यांची ज्यांची जमीन गेली त्यांना मावेजा वाटप केला जात आहे. त्यानुसार या जमीनीचा मावेजा सावकाराला बहाल करण्यात आला. त्या बद्दल नारायण देशमुख यांनी हरकत घेतली. त्यावर सुनावण्याही झाल्या होत्या. आज त्या निर्णयाची प्रत हवी आहे असे सांगत देशमुख जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत सुरु असलेल्या उप विभागीय दंडाधिकार्‍यांच्या कार्यालयात गेले तेथे त्यांनी काही चर्चेनंतर विषारी औषध प्राशन केले. या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही जणांनी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. प्रशासनाने योग्य ती कार्यवाही करीत मोबदल्याबाबत निर्णय घेतला असे नायब तहसीलदार हरीश काळे यांनी सांगितले. तुटपुंज्या रकमेत सावकाराला जमीन दिली आणि त्याचा मोठा मोबदला सावकाराला मिळाला याचे देशमुख यांना नैराश्य आले असावे असे सांगितले जाते. नारायण देशमुख उपविभागीय कार्यालयात विष प्राशन करीत असताना झालेली झटापट सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रित झाली आहे.


Comments

Top