HOME   व्हिडिओ न्यूज

विधवा स्त्री चालत नाही, मग विधूर पुरुष कसा चालतो?

अधिकारांबद्दल जागे, कर्तव्यांबद्दल काय? विलासरावांसारखा मुख्यमंत्री होणे नाही- न्या. सिरपूरकर


लातूर: भारतात शुभ कार्यात विधवा स्त्री चालत नाही पण विधूर पुरुष चालतो, घटनेनुसार या प्रथा बंद व्हायला हव्यात, आपल्या मुलभूत अधिकारांबद्दल आपण जागे असतो पण मुलभूत कर्तव्यांना विसरतो, घटनेनुसार प्रत्येक स्त्रीचा सन्मान व्हायला हवा, केवळ ती स्त्री आहे म्हणून तिचा अव्हेर करता येणार नाही. तिला समानतेचा अधिकार आहे, स्त्रीच्या प्रतिष्ठेला बाधा येईल असं वागता येणार असं कायदा सांगतो याची आठवण सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांनी करुन दिली.
दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात न्यायमूर्ती विकास सिरपूरकर यांचे ‘भारतीय राज्यघटना, सर्वोच्च न्यायालय आणि स्त्री' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी न्या. विकास सिरपूरकर यांना श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेच्या वतीने राष्ट्रीय न्याय गौरव पुरस्काराने सपत्नीक सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप रोख ५१ हजार रूपये व स्मृतीचिन्ह असे आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे प्रभारी सचिव प्राचार्य अनिरूद्ध जाधव हे होते. याप्रसंगी श्रीमती कुमकुम सिरपूरकर, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणचे चेअरमन न्या. अंबादास जोशी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडीत विद्यासागर, ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, संस्थेचे मार्गदर्शक तथा उद्योजक अजय ठक्कर, पत्रकार धर्मराज हल्लाळे उपस्थित होते.
पाहुण्यांचे स्वागत पुजा ठक्कर व संस्थेचे अध्यक्ष हणमंत जगताप यांनी केले. सह्याद्री वाहिनीच्या वृत्तसंपादक ज्योती अंबेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
राज्यघटनेने सर्वांना समान हक्क दिले आहेत. या हक्काबद्दल आपण जागरूक झालो, परंतु कर्तव्याचे काय? असा सवाल उपस्थित करून न्या. विकास सिरपूरकर यांनी डॉ. बाबासाहेबांमुळे दलित समाज जागरूक झाला. त्याप्रमाणेच संपूर्ण समाजमन जागरूक करून त्यांना कर्तव्याची जाणीव करून देण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. डॉ. बाबासाहेबांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय स्वातंत्र्य घटनेच्या माध्यमातून प्रत्येकांना दिले, असे असताना समाजातील महिलांचे स्थान मागे पडले आहे, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. राज्य घटनेतील मुळ गाभा व सर्वोच्च न्यायालयाचे घोषवाक्य हे एका स्त्रीने म्हटले असून ती महाभारतातील गांधारी ही होय. जो धर्म आहे त्याचा विजय होवो, असा त्या घोषवाक्याचा अर्थ आहे. जो कायदा आहे, जे सत्य आहे, त्याचा विजय म्हणजे त्या त्या बाजूने न्याय असला पाहिजे, दिला पाहिजे, असेही न्या. सिरपूरकर म्हणाले.
महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण मिळाले. महिला महत्वाच्या पदावर राहून काम करत आहेत. परंतू त्यांच्या बाजूला त्यांचा पती बसतो, हे अपेक्षीत नाही, अशा मार्गदर्शक सूचना मी कोलकत्ता न्यायालयात मुख्य न्यायाधीश असताना करून सर्व पतींचा रोष ओढवून घेतला होता. आजही या सुचनांचे पालन करण्याची गरज आहे. असे स्पष्ट करून न्या. सिरपूरकर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने सातत्याने स्त्रियांना झुकते माप दिले नाही. परंतु त्यांना न्याय देण्याचा प्रामुख्याने प्रयत्न केला. महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का लागेल अशा कुप्रथांना तिलांजली देण्याची आजही गरज असल्याचे ते म्हणाले. आज समाजकारण राहिलेले नाही. तर माजकारण वाढले आहे, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. महिलांना सायंकाळी ०६ नंतर अटक करू नये, पोलीस ठाण्यात आणू नये. फारच गरज असेल तर महिला पोलीसामार्फत ही कारवाई करावी अशी मार्गदर्शक तत्वे सर्वोच्च न्यायालयानेच घालून दिल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही आमच्या जबाबदाऱ्या पार पाडत नाही, म्हणून कायदे करावे लागत आहेत, असे नमूद करून आजचा हा सत्कार सोहळा म्हणजे आईने लेकराचे केलेले कौतुक आहे, असे आपण मानतो. महिलांवरील अन्याय दूर करण्यासाठी सर्वांनी मिळून काम करूया, हीच माता श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर यांना कृतीशील श्रद्धांजली ठरेल अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
न्यायदेवतेबद्दल आदरभाव व्यक्त करण्यासाठी श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेच्या वतीने हा उपक्रम गेल्या सात वर्षापासून सुरू असल्याचे अजय ठक्कर यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात सांगितले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. नागोराव कुंभार, प्राचार्य अनिरूद्ध जाधव, न्या. अंबादास जोशी आदिंनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास न्यायाधीश, विधीज्ञ यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, व्यापार आदी क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. गणेश बेळंबे यांनी केले. धर्मराज हल्लाळे यांनी आभार मानले.
विलासरावांसारखा मुख्यमंत्री एकदाच होतो
मी सर्वोच्च न्यायालयाचा न्यायमूर्ती म्हणून शपथ घेतली. त्याच्या दुसऱ्या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख माझ्याकडे आले. भलामोठा पुष्पगुच्छ देऊन मला शुभेच्छा दिल्या. वास्तविक पाहता मी त्यांचा सत्कार करायला हवा होता. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रावर लक्ष असू द्या, अशी विनंती केली. मी त्यांना जिल्ह्यापेक्षा मोठे असलेल्या वरोरासाठी जिल्हा न्यायालय देण्याची विनंती केली. त्यावेळी त्यांनी न्यायालय दिले, असा शब्द देऊन तो तीन महिन्यात कृतीत आणला. विलासराव हे दृष्टे नेते होते. असा मुख्यमंत्री एकदाच होत असतो, असे गौरवोद्‌गार न्या. विकास सिरपूरकर यांनी काढले.


Comments

Top