HOME   व्हिडिओ न्यूज

श्रृती आणि ओंकारच्या कुटुंबालाही मिळणार मदत?

अपघातात दगावलेल्या दोन्ही बालकांची तिकीटं नसल्याने पंचाईत, एसटी करणार प्रयत्न


लातूर: १८ तारखेला चलबुर्गा पाटीजवळ झालेल्या एसटी आणि ट्रकच्या अपघातात ०७ जण दगावले, ३५ जण जखमी झाले होते. मृतांच्या नातलगांना १० लाखांची मदत देण्याचे एसटीने जाहीर केले. पण श्रृती तीन वर्षांची आणि ओंकार चार महिन्यांचा होता. यांचाही या अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांना मदत कशी मिळेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण श्रृती आणि ओंकार हे दोघे सहा वर्षाखालची बालके होती. त्यामुळे त्यांचं तिकिट काढण्याची गरज नव्हती. ज्यांना मोफत प्रवासाची सुविधा आहे त्यांचं अपघाती निधन झाल्यास कशी मदत करायची याबाबत कसलेही स्पष्ट निर्देश नाहीत. एसटीच्या तिकिटात विम्यापोटी एक रुपयाचा समावेश असतो. श्रृती आणि ओंकार यांना तिकीट लागत नसल्याने त्यांची तिकिटे काढण्यात आली नव्हती. असे असले तरी लातुरचा एसटी विभाग श्रृती आणि ओंकार यांच्या कुटुंबियांनाही मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते.
या अपघाताला ट्रकचालकच जबाबदार असल्याचा निष्कर्ष एसटीने काढला आहे. लातुरचे विभागीय नियंत्रक सचिन क्षिरसागर, यंत्र अभियंता कालिदास लांडगे, विभागीय वाहतूक अधिकारी अभय देशमुख, औसा आगार प्रमुख पीएम पाटील आणि विभागीय अभियंता राठोड यांच्या पथकाने पाहणी केली, प्रवाशांशी चर्चा केली, चालक वाहकाशी बोलले, अपघाताचा आढावा घेतला त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे.
या अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना आणि जखमींना पी फॉर्म्स दिले आहेत. त्यासोबत आवश्यक कागदपत्रांची यादीही दिली आहे. ते आल्यानंतर त्यांनी एसटीकडे मान्य असलेली मदत दिली जाईल अशी माहिती विभाग वाहतूक अधिकारी अभय देशमुख यांनी दिली. अपघातात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना तातडीची म्हणून दहा हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे. अपेक्षित कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर उर्वरीत नऊ लाख ९० हजार रुपये कुटुंबियांना सोपवले जातील. जखमींना एक हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात आली. त्यांचा उपचाराचा सगळा खर्च एसटी उचलणार आहे.


Comments

Top