HOME   व्हिडिओ न्यूज

शिव्यांची डिक्श्नरी वाचणारा वाहतूक पोलिस भंडारे निलंबित

नगरसेवक शिवकुमार गवळी यांच्या प्रयत्नामुळे पिडीत-दलिताला मिळाला न्याय


लातूर: चर्मकार समाजाच्या गरीब गटई कामगाराला शिवीगाळ करून अपमानित करणारा वाहतूक पोलीस कर्मचारी पंडित भंडारे यास पोलीस अधीक्षकांनी निलंबित केले असल्याची माहिती नगरसेवक शिवकुमार गवळी यानी दिली. त्याच्यावर आरोपपत्रे अन गुन्हाही दाखल करण्यात आला. गरीब कष्ट्कर्‍यास न्याय मिळावा यासाठी नगरसेवक शिवकुमार गवळी यांनी पोलिस अधीक्षकांकडे पाठपुरावा केला होता. त्यांनी आज डीवायएसपी आणि एसपींची भेट घेऊन पिडितांचा संवाद घडवून आणला. त्यानंतर या प्रकरणातील आरोपी मराठी शिव्यांचे थोर अभ्यासक पंडित भंडारे यांना निलंबित केल्याचे पोलीस अधिक्षकांनी सांगितले.
चर्मकार समाजातील बालाजी काळे या गटई कामगारास पोलीस कर्मचारी पंडित भंडारे याने अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली होती. शिव्यांची पद्धती, रचना आणि मारा तोफांपेक्षाही भयंकर होता. लोक कल्पनाही करु शकणार नाहीत अशा शिव्या यावेळी ऐकायला मिळाल्या. त्याची चित्रफित सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. तेव्हापासून लातुरात प्रचंड संताप व्यक्त होत होता. भंडारे याच्यावर कारवाई करावी अशी मागणी केली जात होती. पालकमंत्री संभाजीराव पाटील यानीही चौकशी करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. नगरसेवक गवळी यांनी या कष्टकर्‍याला न्याय मिळावा यासाठी पोलिस अधीक्षकांकडे पाठपुरावा केला होता. याची दखल घेऊन पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशी अहवाल मागवला. प्राथमिक चौकशी अहवालात वाहतूक पोलिस कर्मचारी पंडित भंडारे हा दोषी आढळला. त्यामुळे नगरसेवक शिवकुमार गवळी यांच्या मागणीनुसार पोलीस अधीक्षकांनी गुन्हा दाखल करुन त्यास निलंबित केले. ज्यावेळी ही घटना घडली त्याच वेळी एक पोलीस अधिकारी भंडारे यांच्या समवेत होता. त्याची चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. या चौकशीत दोषी आढळले तर संबंधित अधिकाऱ्यावरही कारवाई केली जाणार आहे.


Comments

Top