Editorial

मुख्यमंत्र्यांना निधी मागता, रस्ते का नाही करत परत?

07-08-2017 : 12:19:15 7983 Views 0 Comments

साल २०१५. मनपाची सर्वसाधारण बैठक. बांधकाम विभागाकडून शहरातले रस्ते मनपाकडे वर्ग करण्याचा ठराव होतो, त्याला संमती मिळते. रस्ते मनपाच्या ताब्यात येतात. कारण काय तर बांधकाम विभागाकडे रस्त्यांच्या देखभालीसाठी पैसा नाही.
साल २०१७. महापालिकेची निवडणूक. महामार्गापासून ५०० मीटर अंतरातली दारु दुकाने बंद करण्याचा आदेश ऐन निवड्णुकीत येतो. सगळे राजकीय पक्ष बेचैन होतात आणि आठवतं अरे हे सगळे रस्ते तर मनपाच्या ताब्यात आहेत. दारु दुकाने बंद करण्याची गरजच नाही, मग सगळ्यांची सोय होते.
शोभा पाटील. भाजपाच्या नगरसेविका. होय सत्ताधारी भाजपाच्या नगरसेविका. त्यांना लातुरच्या रस्त्यांचे हाल बघवत नाहीत. दुरुस्त करण्याची मनपाची ताकद नाही. मग हे रस्ते आपल्या ताब्यात ठेऊन करायचं काय? देऊन टाका बांधकाम विभागाला परत. शोभाताई निवेदन तयार करतात. महापौरांना देतात. पुन्हा सगळे शांत.
परवा महानगरपालिकेचं एक शिष्टमंडळ मुंबईला मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलं. मुख्यमंत्री भेटले नाहीत. त्यांनी पालकमंत्र्यांवर भागवलं. लातुरचे ४४.१० किलोमीटरचे अंतर्गत रस्ते बेहाल आहेत. त्या रस्त्यांवरुन जाताना माणसांची कसरत बघवत नाही. प्रचंड छी थू होतेय. तातडीनं दुरुस्त करायला हवेत. या शिष्टमंडळानं पालकमंत्र्यांना निवेदन दिलं. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी खास बाब म्हणून ६९ कोटी रुपयांचा निधी द्यावा अशी विनंती केली. दारुच्या विक्रीतून शासनाला महसूल मिळतो, दुकानदारांना फायदा मिळतो, घेणार्‍यांची सोय होते पण रस्त्याने जाणार्‍याची गैरसोय होते. मग पुन्हा रस्ते खराब. पुन्हा सरकारला रस्ता दुरुस्तीसाठी निधी मागायचा. त्यापेक्षा हे रस्ते पुन्हा बांधकाम विभागाला परत का केले जात नाहीत? शोभाताईंचा उपाय शिष्टमंडळाला कधी समजणार आहे? यावर कुणी बोलायला तयार नाही. लातुरच्या रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती महणजे ‘मनपाला नाकापेक्षा मोती जड झालाय’ हा मोती उतरवायला हवा अन्यथा लोक खुर्चीवरुन उतरवायला कमी करणार नाहीत!
- रवींद्र जगताप

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी