HOME   महत्वाच्या घडामोडी

भय्युजी महाराजांचा उत्तराधिकारी विनायक दुधाडे कोण आहे?

पारनेरचे विनायक भय्युजींचे निष्ठावंत, विश्वासू, भक्त, वक्तशीर, प्रामाणिक, प्रेमळ अन पट्टशिष्य!

भय्युजी महाराजांचा उत्तराधिकारी विनायक दुधाडे कोण आहे?

पारनेर: आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज यांनी मृत्यूनंतर आर्थिक व्यवहार सोपविलेला त्यांचा सेवक विनायक दुधाडे मूळचा नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील आहे. लोणी-हवेली या गावातील विनायकचे कुटुंबीय रोजगाराच्या शोधात इंदूरला गेले होते. तेथे त्यांचा भय्यूजी महाराज यांच्याशी संपर्क झाला आणि ते त्यांचे विश्वासू बनले.
विनायकचे आजोबा भिकाजी गणपत दुधाडे सैन्यातून निवृत्त झाल्यानंतर इंदूर येथील मालवा मिलमध्ये काम करू लागले. त्यांना काशीनाथ दुधाडे, गोरख दुधाडे व विष्णू दुधाडे ही तीन मुले आहेत. इंदूरमध्ये पारनेर, जामखेड तालुक्यातील अनेक लोक राहतात. इंदूरमधील राजकारणातही नगर जिल्ह्यातील मतदार निर्णायक भूमिका बजावतात. दुधाडे कुटुंबीय राहत असलेल्या नंदानगर भागात बहुसंख्य लोकवस्ती नगर जिल्ह्यातील आहे.
भय्यूजी महाराजांच्या अध्यात्म क्षेत्रातील प्रवेशावेळीच १९९५ च्या सुमारास काशीनाथ दुधाडे त्यांचे भक्त झाले. त्यांचा मुलगा विनायक. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पारनेरला त्यांचे मामा राजेंद्र चेडे यांच्याकडे झाले. भय्यूजी महाराज यांच्या शिफारशीमुळे मुलगा विनायकला इंदूरमध्ये कुठेतरी नोकरी मिळेल या अपेक्षेने काशीनाथ दुधाडे यांनी त्यांना इंदूरला बोलावून घेतले. विनायक २००२-०३ च्या सुमारास इंदूरला आल्यानंतर भय्यूजी महाराजांच्या देवास येथील आश्रमात जाऊ लागले. विनायक यांच्यामधील वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा, निष्ठा, प्रेमळ वागणूक यामुळे काही दिवसांतच ते महाराजांचे पट्टशिष्य बनले. त्यानंतर विनायक महाराजांचे सर्व आर्थिक व्यवहार पाहू लागले. कौटुंबिक निर्णयांमध्येही त्यांचा सहभाग असायचा. महाराजांच्या अनुपस्थितीत विनायक हेच आश्रमाची बाजू सांभाळायचे. विनायक दुधाडे यांची सासुरवाडीही मूळची पारनेर तालुक्यातील गटेवाडीची. मागील काही वर्षांमध्ये भय्यूजी महाराजांचे पारनेर व नगर तालु्क्यात दौरे वाढले होते. राळेगण सिद्धीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व हिवरे बाजारला पोपटराव पवार यांच्याकडे ते नेहमी येत. महाराज पारनेरला आल्यानंतर ते लोणी हवेलीला दुधाडे यांच्या घरी किंवा पारनेरला त्यांच्या आत्या नगरसेविका शशिकला शेरकर व आतेभाऊ पत्रकार दता शेरकर व उदय शेरकर यांच्या घरी आवर्जुन येत असत. विनायक नवी जबाबदारी समर्थपणे पेलतील, असा विश्वास त्यांचे आतेभाऊ शेरकर यांनी व्यक्त केला.
(साभार: महाराष्ट्र टाईम्स)


Comments

Top