Latestnews

महाराष्ट्र केसरी विजय चौधरी थेट शासकीय सेवेत

2016-12-17 13:36:10 4817 Views 0 Comments

नागपूर: महाराष्ट्र केसरी किताब सलग तिसऱ्यांदा पटकविणाऱ्या विजय चौधरी यांचा राज्यातील प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. त्यांना थेट शासकीय सेवेत घेण्याच्या निर्णयावर आठवडाभरात कार्यवाही केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. महाराष्ट्र केसरी विजेते विजय चौधरी यांचा अभिनंदनाचा ठराव मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत मांडला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. ते म्हणाले की, पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या ६० व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत कुस्तीपटू विजय नथु चौधरी यांनी कुस्ती क्षेत्रातील मानाची स्पर्धा जिंकून सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. त्यांच्या या देदिप्यमान कामगिरीबद्दल राज्याच्या प्रत्येक नागरिकाला अभिमान आहे. जळगाव जिल्ह्यातील सायगाव येथे जन्मलेले श्री. चौधरी यांना बालपणापासून कुस्तीची विलक्षण आवड आहे. ते धुमछडी आखाडा आणि मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्राचे मल्ल आहेत. श्री.चौधरी यांनी २००८ मध्ये महाराष्ट्र महाबली पुरस्कार, २०१० मध्ये उत्तर महाराष्ट्र केसरी पुरस्कार, खान्देश केसरी बहुमान, २०११ मध्ये भगवंत केसरी कुस्ती पुरस्कार, त्रिमूर्ती केसरी पुरस्कार या पुरस्कारांसह २०१४, २०१५ आणि यावर्षी झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पुरस्कार मिळविला आहे. श्री. चौधरी यांच्या कामगिरीची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांना थेट शासकीय सेवेत सामावून घेण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्यावर आठवडाभरात कार्यवाही करण्यात येईल. शिवाय श्री.चौधरी यांना ऑलिम्पिक खेळासाठी मदत करण्यात येईल, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी मांडलेला अभिनंदनाचा प्रस्ताव विधानसभेत एकमताने संमत करण्यात आला. महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन उपस्थित होते.‎

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी