Latestnews

शिवस्मारकाच्या भूमीपूजन सोहळ्याचे आमंत्रण!

2016-12-23 15:43:24 5849 Views 0 Comments

मुंबई: मुंबईलगतच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगतिक दर्जाच्या स्मारकाचे जलपूजन व भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २४ डिसेंबर रोजी होत आहे. हा भूमीपूजन सोहळा ‘ह्याची देही ह्याची डोळा’ पाहण्याची संधी लातूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त जनतेनी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. हा सोहळा संस्मरणीय ठरावा यासाठी राज्यातील सुमारे ७० हून अधिक प्रमुख नद्यांचे पाणी आणि गड किल्ल्यांवरची पवित्र माती या ठिकाणी आणली आहे. राजभवनापासून जवळच असणार्‍या अरबी समुद्रातील सुमारे १६ हेक्टर बेटावर छत्रपती शिवाजी महाराजांचे जगातील सर्वात भव्य स्मारक होणार असून यात शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा उभारला जाणार आहे. या पुतळ्याची उंची जगात सर्वात जास्त असणार आहे. आपल्या असामान्य कामगिरीने महाराष्ट्राची पताका जगभरात फडकवणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्राच्या वतीने हे अनोखे वंदन असेल. महाराष्ट्राचे तेजस्वी आणि गौरवशाली इतिहासाचे प्रतिबिंब या स्मारकाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये २३०० कोटी रुपयांची कामे प्रस्तावित आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सर्वाधिक उंचीचा पुतळा, महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित कला दालन, प्रदर्शन गॅलरी, महाराजांच्या चरित्रावर आधारित पुस्तकाचे सुसज्ज वाचनालय, प्रेक्षक गॅलरी, उद्यान, हेलीपॅड, अतिमहत्वाच्या व्यक्तीसाठी व जनतेसाठी जेट्टी (धक्का), सुरक्षा विषयक व्यवस्था, आदी बाबींचा समावेश आहे. या स्मारकास राज्य व केंद्र शासनासह महापालिकेच्या विविध विभागाच्या परवानग्या आवश्यक होत्या. यामध्ये केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, नौदल पश्चिम विभाग, तटरक्षक दल, सागरी किनारा अधिनियम, मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालीका, बेस्ट,मुंबई पोर्ट ट्रस्ट, बी.एन.एच.एस. इंडिया, मत्सव्यवसाय विभाग, राष्ट्रीय सुरक्षा दल दिल्ली, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण अशा बारा विभागांची ना हरकत प्रमाणपत्रे शासनास प्राप्त झाली आहेत. या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक निविदा मागविण्यात आलेल्या आहेत. येत्या ०३ वर्षात स्मारक पूर्ण करण्याचे सरकारचे नियोजन असून ते भावी पिढ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. त्यामुळे प्रकल्पाचे अनोखे व विशिष्ट स्वरुप लक्षात घेवून प्रकल्पाचा आराखडा, निविदा कागदपत्रे तयार करणे, प्रकल्पावर देखरेख करणे, यासाठी दिनाक ११ एप्रिल २०१६ रोजी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करुन त्यानंतर प्रकल्प आराखडा मंजुर करण्यात आला आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी