Latestnews

नांदेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन

2017-06-17 21:11:49 1700 Views 0 Comments

मेधा पाटकर, कुमार केतकर, डॉ. प्रज्ञा दया पवार, संजय आवटे, डॉ. भालचंद्र कांगो यांची उपस्थिती
नांदेड (प्रतिनिधी) - समाजाला संविधानसाक्षर करणे, सांवैधानिक नैतिकतेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दृष्टिकोन प्रतिष्ठित करणे आणि सर्व समविचारी प्रागतिक तत्त्वांचा समन्वय घडवून आणणे, या उद्दिष्टपूर्तीसाठी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचा वैचारिक वारसा प्रगल्भतेने पुढे नेण्याच्या दृष्टीने येत्या २५ जून २०१७ रोजी एक दिवसीय पाचवे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
पारंपरिक साहित्य संमेलनापासून या संमेलनाचा उद्देश वेगळा आहे. प्रगतीशील लेखक संघ, मौर्य प्रतिष्ठान आणि दैनिक उद्याचा मराठवाडा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या संमेलनाचे मध्यवर्ती विचारसूत्र ‘सामाजिक न्याय’ असे आहे. रविवारी, २५ जून रोजी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात दिवसभर चालणार्‍या या संमेलनाचे उद्घाटन सकाळी १० वाजता; ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांचे ‘सामाजिक न्यायात एन.जी.ओ.ची भूमिका भ्रम आणि वास्तव’ या विषयावरील बीजभाषणाने होणार आहे. या प्रसंगी महापौर शैलजा किशोर स्वामी यांची प्रमुख उपस्थिती असेल. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी हे संमेलनाची भूमिका विशद करतील.
दुसर्‍या सत्रात दुपारी १२.३० वाजता ज्येष्ठ पत्रकार पद्मश्री कुमार केतकर यांचे ‘राज्यघटनेतील सामाजिक न्यायाची संकल्पना’ या विषयावर यांचे व्याख्यान होईल. दुपारी ०२.३० वाजता प्रा. डॉ. प्रज्ञा दया पवार यांचे ‘महिला, मुले, अल्पसंख्याक आणि सामाजिक न्याय’ या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी ०३.३० वाजता ‘सामाजिक न्याय आणि माध्यमांची भूमिका’ या विषयावर ज्येष्ठ माध्यमतज्ञ - संपादक पत्रकार संजय आवटे यांचे व्याख्यान तर ०४.३० वाजता ज्येष्ठ साम्यवादी विचारवंत डॉ. भालचंद्र कांगो हे ‘शेतकरी, श्रमिक आणि ‘सामाजिक न्याय’ या विषयावर श्रोत्यांशी संवाद साधतील. सायंकाळी ०५.३० वाजता या संमेलनाचा समारोप होणार आहे. प्रमुख वक्ते तथा दलित साहित्य आणि आंबेडकरी आंदोलनाचे राष्ट्रीय किर्तीचे अभ्यासक कार्यकर्ते, नवी दिल्लीचे प्रा. डॉ. बजरंग बिहारी तिवारी यांचे ‘सामाजिक न्याय और आंबेडकरवादी आंदोलन’ या विषयावर समारोपाचे व्याख्यान होणार आहे. समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी ठाणे येथे संपन्न झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तम कांबळे हे असतील. ज्येष्ठ पत्रकार संजीव कुळकर्णी आभार व्यक्त करून संमेलनाची सांगता करतील.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी