Latestnews

आमदारांनी खेळला फुटबॉल, हिवाळी अधिवेशनात क्रिकेटचे सामने- मुख्यमंत्री

2017-08-11 6:58:42 6697 Views 0 Comments

मुंबई : 'विधान परिषद सभापती-इलेव्हन'' विरुद्ध 'विधानसभा अध्यक्ष-इलेव्हन'' असा आमदार चषक फुटबॉल सामना विधानभवन प्रांगणात रंगला. सामन्यात चुरशीच्या लढतीत 'विधानसभा अध्यक्ष-इलेव्हन' संघ विजयी ठरला. या फुटबॉल सामान्यामुळे आज विधानभवन प्रांगणात खेळाचे वातावरण निर्माण झाले. याच अनुषंगाने हिवाळी अधिवेशना दरम्यान याच दोन संघामध्ये आणि महिला आमदारांसाठीही स्वतंत्र क्रिकेटचे सामन्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले. फुटबॉल खेळताना अनेक आमदारांना स्वत:चे वज्न सांभाळताना कसरत करावी लागत होती.
विशेष म्हणजे या फुटबॉल सामन्याचे रंगतदार धावते समालोचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी केले. या स्पर्धेला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती माणिकराव ठाकरे, विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्यासह मंत्रिमंडळातील मंत्री, राज्यमंत्री उपस्थित होते.
जागतिक फुटबॉल महासंघाची (फिफा) १७ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात भारतामध्ये होत आहे. भारतीय उपखंडामध्ये होणारी ही पहिली फिफाची विश्वचषक स्पर्धा आहे. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने संपूर्ण देशात क्रीडा संस्कृती रुजविण्याचे प्रयत्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘'मिशन- इलेव्हन मिलियन' हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात 'मिशन-वन-मिलियन' हा फुटबॉल प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या मिशनच्या निमित्ताने शाळांमधून जवळपास १० लाखांहून अधिक मुला-मुलींपर्यंत फुटबॉल आणि क्रीडा संस्कृती पोहोचविण्यात येणारे महाराष्ट्र हे पहिलेच राज्य ठरत असल्याचे तावडे यांनी सांगितले.
आज झालेल्या या फुटबॉल स्पर्धेत विधानपरिषद आणि विधानसभा सदस्यांनी भाग घेत फुटबॉल स्पर्धेचा आनंद लूटला. येणाऱ्या काळात प्रत्येक आमदार आपल्या मतदारसंघात आमदार निधीतून फुटबॉल स्पर्धा आयोजित करणार आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी