Latestnews

मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा- आ. पंडीत, चव्हाण, काळे

2017-08-12 12:19:02 8161 Views 0 Comments

औरंगाबाद: मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीवर सरकार गंभीर नसून मराठवाड्यात दुष्काळ जाहिर करा, मराठवाड्याला आपल्या हक्काच्या पाण्यासाठी भांडावे लागत असून हक्काचे पाणी केव्हा देणार असा जाब विचारात आ. अमरसिंह पंडित, आ. सतीश चव्हाण यांनी आज सरकारला धारेवर धरले.
मराठवाड्यातील सिंचनाच्या अपुर्‍या सुविधा, दुष्काळी परिस्थिती, शेतीमालाचे पडलेले भाव, सततच्या नापीकी आणि कर्जबाजारीपणामुळे मराठवाड्यात वाढत चाललेले शेतकरी आत्महत्येचे प्रमाण आदींबाबत आ. अमरसिंह पंडित, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे यांनी विधान परिषदेत नियम ९३ अन्वये अल्पकालीन चर्चा उपस्थित केली. मराठवाड्यात दररोज दोन शेतकरी आत्महत्या करत आहेत. शेतकर्‍यांचा सरकारवर विश्‍वास राहिला नाही. तरूण मुले, मुली आत्महत्या करीत आहेत. तरीही राज्यकर्ते हातावर हात देवून बसले आहेत. मराठवाड्याला आपल्या हक्काच्या पाण्यासाठी भांडावे लागत असून मराठवाड्याला हक्काचे पाणी कधी देणार? असा सवाल करून मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आ. अमरसिंह पंडित यांनी यावेळी केली. मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांच्या व्यथा पोटतिडकीने सभागृहात मांडत असताना वेळेच्या बंधनामुळे उप सभापतींनी आ. अमरसिंह पंडित यांना मध्येच थांबविले. त्यामुळे आ. अमरसिंह पंडित संतप्त झाले. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर आपणाला बोलू दिले जात नाही, मराठवाड्याच्या भावना आम्ही सभागृहात मांडायच्याच नाहीत का? असा सवाल करून ते अतिशय भावूक झाले. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सभागृहात त्यांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडल्यानंतर मात्र काही क्षण विधान परिषद सभागृह स्तब्ध झाले होते. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मध्यस्थी करत उप सभापतींना वेळ वाढवून देण्याची विनंती केली. त्यानंतर आ. अमरसिंह पंडित बोलायला उभे राहिले मात्र त्यांना यावेळी आपल्या भावनांना आवर घालता आला नाही आणि त्यांच्या डोळ्यातून अक्षरश: अश्रू बाहेर पडत असल्याचे पाहून विधान परिषदेतील सर्वच सदस्य अवाक झाले. या घटनेनंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. सुनील तटकरे, आ. सतीश चव्हाण, आ. विक्रम काळे आदी सदस्यांनी मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीवर आक्रमक भूमिका मांडली. आ. सतीश चव्हाण यांनी हे सरकार सत्तेत आल्यापासून मराठवाड्यात एकाही नवीन सिंचन प्रकल्पाचे काम सुरू झाले नाही, त्यामुळे मराठवाड्यात सिंचन क्षेत्रात वाढ होत नसल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. गोदावरीचे पाणी आंध्रप्रदेशात वाहून जात आहे. त्याचे नियोजन करण्यात सरकार अपयशी ठरत आहे. औरंगाबाद मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णय झाले मात्र त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचे आ. सतीश चव्हाण यांनी सांगितले.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी