LaturNews

मुलींनी स्वतःचा आत्मसन्मान जपायला हवा - वर्षा दंडिमे

2017-01-08 18:14:28 929 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): समाजात वावरत असताना स्त्री-पुरुष समानता असली तरी मुलींनी जबाबदारीने वागले पाहिजे. मुलींनी आत्मसन्मान जपायला हवा. स्वरक्षणासाठी पुढे आले पाहिजे. ‘क्रांतिज्योत’ हा वसुंधरा प्रतिष्ठानचा उपक्रम खरोखरच स्तुत्य असल्याचे प्रतिपादन लातूरच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक वर्षा दंडिमे यांनी आज येथे केले. वसुंधरा प्रतिष्ठान क्रांतिज्योत अभियान अंतर्गत लातुरातील सदगुरू नगर येथील केदारनाथ शाळेत 'क्रांतिज्योत अभियान' जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहशिक्षिका सौ. सुनीता हिरवे तर मंचावर वसुंधरा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा, वसुंधरा प्रतिष्ठानच्या युवती-महिला आघाडी समन्वयिका आशा आयाचित, मुख्याध्यापक गोविंदसिंह पालिमकर, सहशिक्षिका सौ. सुषमा होनमाने, सौ. रेणुका बोरा, ऐश्वर्या बोरा, सुष्मिता बोरा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्रास्ताविक वसुंधरा प्रतिष्ठानचे प्रवक्ते प्रसाद गायकवाड यांनी केले.
यावेळी बोलताना वर्षा दंडिमे यांनी महिलांच्या विविध कायद्याबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या, मुलींनी समाजात वावरताना जबाबदारीने वागले पाहिजे. प्रत्येक मुलीने आत्मसन्मान जपायला हवा. आई-वडीलांचा आदर करायला हवा. समाजात वावरत असताना जबाबदारीचे भान ठेवायला हवे, असेही त्यांनी सांगितले. वसुंधरा प्रतिष्ठानने दर आठवड्यात विविध शाळांत जाऊन मुलींमध्ये जनजागृतीसाठी सुरु केलेला 'क्रांतिज्योत अभियान' हा उपक्रम नक्कीच मुलींसाठी दिशादर्शक आहे, असे त्यांनी यावेळी नमूद केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मुख्याध्यापक गोविंदसिंह पालिमकर, शिक्षक शाहुराज मुदगले, सुशिल वैद्य, बाळू हाके, वसुंधरा प्रतिष्ठानचे जिल्हा प्रमुख विशाल शिंदे, सोशल मिडिया प्रमुख धनराज कोंबडे, आशा आयाचित, रेणुका बोरा यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुशिल वैद्य यांनी तर आभार रेणुका बोरा यांनी मानले. आठवड्यातील एक दिवस विविध शाळांमध्ये जावून 'क्रांतिज्योत अभियान' च्या माध्यमातून मुलींमध्ये स्वरक्षण, सामाजिक जबाबदाऱ्या याबद्दल जनजागृती केली जात आहे.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!

महत्वाच्या घडामोडी