HOME   लातूर न्यूज

रेल्वेबोगी प्रकल्पाचे ६० टक्के काम पूर्ण

लवकरच उत्पादन, रेल्वे बोर्डाचे सदस्य निजाम शेख यांची माहिती

रेल्वेबोगी प्रकल्पाचे ६० टक्के काम पूर्ण

लातूर: लातूर येथील मराठवाडा रेल्वेबोगी प्रकल्पाचे काम गतीने पूर्ण केले जात आहे. हा महत्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण होऊन उत्पादनास प्रारंभ व्हावा या अनुषंगाने सर्व कामे केली जात आहेत. आजवर प्रकल्पाचे ६० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले असून लवकरच काम पूर्ण होऊन लातूरच्या प्रकल्पातील पाहिली बोगी बाहेर पडणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या महाराष्ट्र - कर्नाटक -मध्यप्रदेश झोनल सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी दिली.
निजाम शेख यांनी या प्रकल्पाची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून कामकाजाची माहिती घेतली. सिव्हील हेड महेश लेंगरे, सहाय्यक प्रकल्प अभियंता काशिनाथ गजरे, मोहम्मद शरीक,लायजनिंग ऑफिसर शरद सगर यांनी यावेळी विविध बाबींची माहिती दिली. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गंगासिंह कदम यांची शेख यांच्यासमवेत उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारच्या पहिल्याच कार्यकाळात या प्रकल्पाला मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला प्रारंभही झाला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्यासारख्या नेतृत्वामुळे राज्यपातळीवर या प्रकल्पाला तात्काळ जागा उपलब्ध करून देण्यात आली. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी प्रकल्पासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करून घेतल्यामुळे प्रकल्पाची कामे अतिशय वेगाने मार्गी लागली. अवघ्या महिनाभरात भूमिपूजन आणि लगेच कामास प्रारंभ झाला.
आजरोजी प्रकल्पस्थळावर ६० टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. पास ४०० एक्कर परिसरावर हा प्रकल्प उभा राहत असून त्यासाठी १ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. दरवर्षी या प्रकल्पातून २५० रेल्वे बोगी निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे निजाम शेख यांनी सांगितले.


Comments

Top