HOME   लातूर न्यूज

लोकसभा निवडणुकीबाबत जिल्हाधिकार्‍यांच्या सक्त सूचना

यशस्वीतेसाठी नोडल अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबदारीचे काटेकोरपणे पालन करावे

लोकसभा निवडणुकीबाबत जिल्हाधिकार्‍यांच्या सक्त सूचना

लातूर: आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या यशस्वीतेसाठी प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच ही निवडणूक शांततामय वातावरणात पारदर्शक व नि:पक्षपातीपणे पार पाडयासाठी प्रत्येकाने परस्परांत समन्वय ठेवून सांघिकपणे काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जी. श्रीकांत यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ अंतर्गत नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत मार्गदर्शन करत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, अतिरिक्त पोलिस अधिक्षक काकासाहेब डोळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी प्रताप काळे, उपजिल्हाधिकारी (सा.) सुनील यादव, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्यासह सर्व समित्यांचे नोडल अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, निवडणूकांचे काम हे सांघिक काम असून प्रत्येक अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबदारीचे भान ठेवून काटेकोरपणे काम करावे. निवडणूकीच्या कामांमध्ये कोणाकडूनही एक ही चूक होणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. जर निवडणूक कामांत हलगर्जीपणा झाला तर संबंधितांवर प्रथम एफआयआर दाखल करुन नंतर निलंबन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
कसभा सार्वत्रिक निवडणूक २००९ मध्ये ५४.९३ तर सन २०१४ मध्ये ६२.६९ टक्के मतदान झालेले होते. परंतु आगामी लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्व यंत्रणांनी स्वीप अंतर्गत मतदारांचे प्रबोधन करावे. त्याप्रमाणेच मागील निवडणूकीत ज्या मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी कमी होती त्या ठिकाणी मतदार जनजागृतीचे कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिले.
मतदार जागृती मंच
भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक ०४ जानेवारी २०१९ च्या पत्रान्वये शासकीय विभागांनी त्यांच्या कार्यालयात मतदार जागृती मंचची स्थापना करण्याचे सूचित केले असून त्यानुसार जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या हस्ते अतिरिक्त पोलिस अधिक्षकांना सदरचे पत्र देऊन मतदार जागृती मंच (Voters awareness Forums) स्थापना करण्याविषयी सूचित केले. या मंचचा उद्देश मतदार, नोंदणी, निवडणूक प्रक्रिया तसेच मतदारांमध्ये मताच्या हक्काची जाणीव करुन देणे हा असून प्रत्येक शासकीय विभागांनी आपल्या कार्यालयात या मंचाची स्थापना करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले.


Comments

Top