HOME   लातूर न्यूज

निवडणुका लागल्यात, काळजी घ्या

विना परवानगी मुख्यालय सोडू नका -जिल्हाधिकारी जी. श्रीकांत

निवडणुका लागल्यात, काळजी घ्या

लातूर: भारत निवडणूक आयोगाने दिनांक १० मार्च २०१९ रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. संपूर्ण देशभरात आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु झाली. त्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीबाबतच्या विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी श्रीकांत बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त एम. डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलिस अधिक्षक राजेंद्र माने, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत गव्हाणे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी दीपाली मोतीयेळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मुख्य वित्त लेखा अधिकारी जवळगेकर आदिसह इतर सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीकांत म्हणाले की, ४१-लातूर (अ. जा.) लोकसभा मतदारसंघात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. तरी सर्व संबंधित शासकीय विभागांनी विविध योजना व माहितीपर बॅनर्स, होर्डिंग, पोस्टर्स आदी त्वरित काढून घ्यावेत. तसेच ज्या विभागांची कामे सुरु आहेत अशा विभागांनी त्यांच्या सुरु असलेल्या कामांची यादी जिल्हा प्रशासनाला १३ मार्च पर्यंत सादर करावी. या यादी व्यतिरिक्त एकही काम सुरु असेल तर त्या विभाग प्रमुखांवर आचारसंहिता भंगाची कारवाई होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा निवडणूक आयोगाकडे वर्ग होत असल्याने जिल्हा निवडणूक विभागाच्या परवानगी शिवाय कोणीही मुख्यालय सोडता कामा नये. तसेच कोणाचाही नातेवाईक निवडणुकीत उभा राहण्याची शक्यता आहे अशा अधिकारी-कर्मचाऱ्यांनी माहिती दयावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिल्या.
सर्व शासकीय विभागांनी त्यांच्या संकेतस्थळावरील राजकीय नेत्यांची छायाचित्रे व नावे वगळावीत. तसेच आपला कार्यालय परिसर व वाहनाचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी. शहरी व ग्रामीण भागात ज्या ज्या ठिकाणी कोणत्याही शासकीय योजनांच्या तसेच राजकीय जाहिरातीचे बॅनर्स संबंधितांनी त्वरित काढून टाकावेत, असे ही जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले. लातूर लोकसभा मतदार संघासाठी दुसऱ्या टप्प्यात दिनांक १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान होणार असल्याने सर्व विभागांनी या मतदान प्रक्रियेत जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी व्हावे या करिता प्रयत्न करावेत. मतदानाची टक्केवारी किमान ७० टक्केपेक्षा अधिक जाण्यासाठी मतदार जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी करुन लोकसभा निवडणूक निर्भय, नि:पक्ष व पारदर्शकपणे होण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी दिलेली जबाबदारी परस्परांत योग्य समन्वय ठेवून चोखपणे पार पाडण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी मनपा आयुक्त एम. डी. सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी इटनकर, पोलिस अधिक्षक श्री.माने यांनी ही मार्गदर्शन केले


Comments

Top