टॉप स्टोरी

गोमारे, गोविंदपूरकर, गवारे यांनी बसवले पाण्याचे मीटर्स, कॉंग्रेस मात्र मागे

2017-01-02 20:18:49 Topstory, 2443 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): भविष्यात लातूरला पाणी कमी पडू नये, पाण्याचा अपव्यय टळावा, गळती आणि चोरी रोखली जावे यासाठी मनपाने नळाला मीटर्स बसवण्याची मोहीम सुरु केली. लातूरचे प्रसिद्ध थ्री जी अर्थात मनोहरराव गोमारे, अशोक गोविंदपूरकर आणि उदय गवारे यांनी शनिवारी सांगितल्याप्रमाणे आज आपापल्या घरी मीटर्स बसवून घेतले. आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा केवळ गोमारे आणि गोविंदपूरकर यांच्या घरी मीटर्स दिसली. गवारे यांच्या गुळ मार्केट चौकातील घरी मीटरचा पत्ता नव्हता. याबाबत चौकशी केली असता गवळीनगर भागातील घरी मीटर बसवल्याचे गवारे यांनी सांगितले. गुळ मार्केट चौकातील घरीही लवकरच मीटर बसवले जाईल अशी माहिती त्यांनी दिली. याचवेळी नागरी हक्क समितीचे सदस्य बसवंत भरडे यांचे घर आम्ही गाठले. भरडेंच्या घरी नळ आला होता. पाणी भरणे चालू होते. मोटार चालू होती. मीटरचा पत्ता नव्हता. चौकशी केली असता भरडे यांनी मीटर आणून दाखवलं. पाणी भरणं संपल्यावर मीटर बसवणार आहोत असं त्यांनी सांगितलं. पण नागरी हक्क समितीनं त्या आधीच चौघांच्या घरी मीटर्स बसवल्याचं पत्रकार परिषदेत घोषित केलं होतं!
मनपाने सांगितलेल्या मानकांप्रमाणे लातुरात १५ ते २० दुकानात मीटर्स ९०० ते १२०० रुपये दरात उपलब्ध आहेत. मनपाने अधिकृत प्लंबर्सची यादी जाहीर करावी, पाण्याचा दर जाहीर करावा, पाण्याची गळती थांबवावी आणि नागरिकांनी मीटर्स बसवून घ्यावीत असे आवाहन अशोक गोविंदपूरकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
पाण्याच्या खाजगीकरणाचा निर्णय जनतेच्या पैशाची लूट करणारा होता. आम्ही आंदोलन केले, त्याला जनतेने साथ दिली. आमचा विरोध मीटरला नाही. पाणी वाचावं, जनतेचा खर्चही वाचावा हा उद्देश होता. आमचा उपक्रम जनहिताचा होता. यात कसलेही राजकारण नव्हते. आमच्या आंदोलनामुळे लातूरकरांना पिण्याच्या पाण्याची टंचाईला सामना करावा लागला हा आरोप बालिशपणाचा आहे. मागच्या मे महिन्यात पाणी टंचाई काळात लातूरचे लोकप्रतिनिधी लातूर शहरात नव्हते, कुटुंबियासह परदेशात गेले होते. असा आरोप मनोहरराव गोमारे यांनी केला. लातूरची जनता पाण्यासाठी वणवण भटकत असताना आमदारांनी लोकांना पाणी मिळावं यासाठी अपार परिश्रम घेतले, मनपाने त्यांना जलरत्न पुरस्कार दिला हे आमदारांना शोभत नाही असंही गोमारे म्हणाले.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!