टॉप स्टोरी

‘जलयुक्त’च्या कामाला शिवराज पाटलांचे एक लाख रुपये!

2017-01-08 15:12:01 Topstory, 4078 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूरकरांच्या विलक्षण जिद्दीचा-एकजुटीचा परिचय जगाला करुन देणार्‍या ‘जलयुक्त लातूर’ या प्रकल्पाचे काम पाहून प्रभावित झालेल्या माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी या कामास भेट दिली. पाहणी केली. हे काम असेच निरंतर चालू रहावे अशी शुभेच्छा देत एक लाखाचा धनादेश जलयुक्त समितीकडे सुपुर्त केला.
लातूरच्या पाणी टंचाईचा वृत्तांत वर्तमानपत्रातून वाचत होतो. या प्रकल्पास भेट द्यावी, कार्यकर्त्यांना कौतुकाची दाद द्यावी अशी अनेक दिवसांपासून इच्छा होती. या प्रक्ल्पास भेट देण्याची वेळ आली. नदीपात्रात साठलेले मुबलक पाणी पाहून मन भरुन आले अशा भावना चाकूरकर यांनी व्यक्त केल्या. जलयुक्तचे काम पुढील काळातही निरंतर चालणार अहेत. समितीला अनेक कामे करावी लागणार आहेत. यास निधी लागणार आहे. निधी ओघ सुरुच रहायला हवा हे सर्वांच्या लक्षात यावे म्हणून एक लाख रुपये देत आहे. समाजाने आगामी काळातही भरभरुन मदत द्यावी असे आवाहन चाकूरकर यांनी केले. चाकूरांनी जलयुक्त समितीच्या सदस्यांसोबत साई, आरजखेडा, नागझरी आदी भागातील जलयुक्तच्या कामांची पाहणी केली. यावेळी डॉ. अशोक कुकडे, त्र्यंबकदास झंवर, मकरंद जाधव, वैजनाथ शिंदे, निलेश ठक्कर, शिवदास मिटकरी, सुनील देशपांडे, डॉ. अर्चना पाटील चाकूरकर उपस्थित होते. आपण लातूरचे नगराध्यक्ष असताना साई आणि नागझरी येथून शहराला पाणी पुरवठा सुरु केला होता याची आठवण चाकूरकर यांनी सांगितली.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!