टॉप स्टोरी

शाळा आली पडायला, म्हणून भरवली जिल्हा परिषदेत!

17-06-2017 : 09:24:49 Topstory, 2247 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूरपासून अवघ्या आठ किलोमीटरवर असलेल्या खंडापूर येथील जिल्हा परिषदेची शाळा पडायला आली आहे. अनेकदा विनंती करुनही दुरुस्ती होत नसल्याने या खंडापुरच्या सरपंचांसह विद्यार्थ्यांनी आज जिल्हा परिषद कार्यालय गाठले. शिक्षण विभागात बैठक मारुन शिकणे आणि शिकवणे सुरु केले. यावेळी विद्यार्थ्यांनी खिचडीही खाल्ली. जोपर्यंत पक्के आश्वासन मिळत नाही तोपर्यंत इथून उठणार नाही असा निर्धार या सर्वांनी केल्याने प्रशासनाची अडचण झाली होती. अखेर विशेष बाब म्हणून शाळा बांधून देण्याचा प्रस्ताव पाठवू असे आश्वासन मिळाले आणि विद्यार्थी, गावकरी आणि सरपंच गावाकडे परतले.
खंडापुरच्या या शाळेची अवस्था उत्तरोत्तर वाईट होत चालली आहे. फरशा उखडल्या आहेत, खिडक्या फुटल्या आहेत, अनेक भिंतींना भगदाडं पडली आहेत. सात खोल्यांपैकी पाच खोल्या गळतात, छतासाठी टाकण्यात आलेले बीम केव्हाही पडायला तयार आहेत. या अवस्थेविषयी वारंवार तक्रारी, विनंत्या करुनही यावर इलाज केला जात नाही. कंटाळलेल्या १०० खंडापूरकर आणि २२० विद्यार्थ्यांनी या आधीही जिल्हा परिषद कार्यालयात अशीच शाळा भरवली होती. पण त्याचाही उपयोग झाला नव्हता. परिणामी आज पुन्हा अशीच शाळा भरवावी लागली. या विद्यार्थ्यांना सरपंचांनी शिकवले, विद्यार्थ्यांनी खिचडीही खाल्ली.
२०१२ साली याच शाळेत तिसरीत शिकणारी ज्योती महादेव ढोरमारे शाळेतच साप चावल्याने मरण पावली होती. सातवीपर्यंत चालणार्‍या या शाळेत सात खोल्या असून पाच खोल्यांची अवस्था वाईट आहे. लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांच्या ७८ वर्गखोल्या बांधून देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी केवळ १५ खोल्यांना मान्यता मिळाली आहे अशी माहिती उप शिक्षणाधिकारी अरविंद मोहरे यांनी दिली. यावेळी कृष्णा कैले, बालाजी वलसे, शिवाजी कावळे, संतोष जाधव, संजय गायकवाड, बालाजी गौतम, नागोराव गायकवाड, परमेश्वर जाधव, अनिल कांबळे, रुक्मिणबाई गायकवाड, उक्मिणबाई धावारे, रुकसाना शेख, मालन रसाळ, फुलाबाई जाधव, अनुसया मुलगे, जयश्री सारुळे, शांताबाई कांबळे, मंकाबाई गायकवाड, शकुंतला कावळे, सिमा घोडके, सत्यभामा भोसले, रेश्मा गायकवाड, जयश्री सारुळे उपस्थित होते.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!