टॉप स्टोरी

लातूर मनपा निवडणुकीत कमी पडलो- तटकरे

17-06-2017 : 09:24:39 Topstory, 2571 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूर महानगरपालिका निवडणुकीत आम्ही कमी पडलो हे खरे आहे, त्याचं आत्मपरिक्षण करणार आहोत अशी कबुली राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. मुख्यमंत्रीच मध्यावधी निवडणुकीचे संकेत देऊ लागलेत, त्यांनी काय बोलावं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मध्यावधी निवडणुका लागल्याच तर आम्ही सर्व शक्तीनिशी तयार आहोत असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सांगितलं. हे दोघेही पत्रकार परिषदेत बोलत होते. राष्ट्रवादीच्या जिल्हा मेळाव्याच्या निमित्ताने ते लातुरात आले होते.
लातुरच्या दगडोजीराव देशमुख सभागृहात झालेल्या मेळाव्यानंतर उभयतांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघही उपस्थित होत्या.
या राज्यातले शेतकरी संप करतात हे सरकारचं दुर्दैव आहे. सरकारला परिस्थिती हाताळता आली नाही. शेतकर्‍यांना १० हजार रुपये कर्जापोटी उचल देण्यासाठी काढण्यात आलेला जीआर शेतकर्‍यांचा विश्वासघात करणारा आहे. यातील निकष अतिशय कठोर आहेत. यामुळे गरजू शेतकरी बाहेर फेकला जात आहे. आधी सरसकट कर्जमाफी देऊ असं संगितलं पण तसं करायला सरकार तयार नाही. या संदर्भात चर्चेला बोलावल्यास आमची भूमिका मांडू. या सरकारच्या काळात जी काही आंदोलने झाली त्यात फूट पाडण्याचा प्रयत्न सरकारने केला. शेतकरी आंदोलनाचेही असेच झाले. गरजू शेतकर्‍यांची काळजी सरकारला घ्यावी लागेल. अन्यथा शेतकरी पुन्हा आंदोलन करतील, ही वेळ सरकारने येऊ देऊ नये, सरकारला वाकावंच लागेल असे सांगून अजित पवार मध्यावधी निवडणुकांबाबत बोलताना म्हणाले, सरकारने काय बोलावे हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आम्ही विरोधात आहोत, संख्येनं कमी आहोत. आम्ही आमची संघटना बळकट करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यासाठी राज्याचा दौरा आखला आहे. कार्यकर्त्यांना काय वाटतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. मध्यावधी निवडणुका केव्हाही लागू द्या लढायला तयार आहोत. फक्त सरसेनापतीच्या आदेशाची प्रतिक्षा आहे!
लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी हेलिकॉप्टरच्या तांत्रिक कारणामुळं आपण प्रचाराला येऊ शकलो नाही. मागच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे १३ नगरसेवक होते. यावेळी केवळ एक निवडून आला आहे. भाजपा केंद्रात आल्यानंतर सत्तेची सगळी परिमाणं बदलली. भाजपाने साम, दाम, दंड, भेद सगळे मार्ग वापरले. नगरपालिका आणि महानगरपालिका कायद्यात बदल केले, या निवडणुकीत आम्ही कमी पडलो. त्याचं आत्मपरिक्षण करण्यासाठीच येथे आलो असं सुनील तटकरे यांनी सांगितलं. यावेळी जीवनराव गोरे, आ. विक्रम काळे, बाबासाहेब पाटील, हरीहर भोसीकर, जयदेव गायकवाड, प्रदीप साळुंके, उमेश पाटील, बसवराज पाटील नागराळकर, मकरंद सावे, बबन भोसले, संजय शेटे, मुर्तुजा खान, प्रशांत पाटील उपस्थित होते.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!