टॉप स्टोरी

अवैध आंतरराष्ट्रीय कॉलींग सेंटर उध्वस्त, दोघांना अटक

19-06-2017 : 03:20:23 Topstory, 3122 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातुरच्या कॉल सेंटरमधून आंतरराष्ट्रीय कॉल्सचं कनेक्शन जम्मू काश्मीरातील गुप्तचरांकडून मिळालं. यावरुन एटीएसने लातुरात अनेक ठिकाणी धाडी टाकून सिमकार्ड्स, संगणक आणि कॉल ट्रान्स्फरींग मशीन्स बीएसएनएल अधिकार्‍यांच्या उपस्थितीत जप्त केल्या. शंकर बिरादार आणि रवी साबदे या दोघांना अटकही केली. एक कारवाई नंदी स्टॉप परिसरात तर दुसरी प्रकाशनगर भागात झाली. औरंगाबादहून आलेल्या एटीएसच्या टीमने लातूर पोलिसांची मदत घेऊन काल रात्री ही कारवाई केली. लातुरच्या या आरोपींचा आंतरराष्ट्रीय रॅकेटशी संबंध असावा असा संशय पोलिसांना आहे. या कॉल सेंटरमधून अनधिकृत गेटवे वापरुन अवैधरित्या लोकल मोबाईलवरुन आंतरराष्ट्रीय कॉल वळवले जात असल्याचे सांगण्यात आले. लातुरहून या सेंटर्समधून काश्मीरातही कॉल होत असल्याची माहिती मिळाली आहे. कमी खर्चात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कॉलिंग होत असल्याने बीसएनएलचे १५ कोटींचे नुकसान झाले आहे. मुळात या सेंटर्समधून होणार्‍या कॉल्समधून कसल्या माहितीची देवाण घेवाण होत होती याची तपासणी केली जात आहे. यातून धक्कादायक माहिती पुढे येऊ शकते.
परदेशात कॉल करण्यासाठी आरोपींनी विशिष्ट प्रकारचे अ‍ॅप तयार केले होते. अ‍ॅप आणि एका विशिष्ट यंत्राद्वारे आंतरराष्ट्रीय कॉलींग केली जात होती. हे कॉल आंतरराष्ट्रीय असले तरी त्याची खबर मोबाईल कंपनीला लागत नसे. फोन करणारा आणि फोन घेणारा दोघांनाही शासनाने निर्धारित केलेले शुल्क लागत नसल्याने कॉलींग अतिशय स्वस्तात होत होती. मात्र यातून शासनाचा कर चुकविला जात होता. शिवाय सुरक्षाविषय्क धोकेही निर्माण झाले होते अशी माहिती अपर पोलिस अधीक्षक काकासाहेब डोळे आणि एटीएसचे अधिकारी राजकुमार पुजारी यांनी दिली.
रवी साबदे पूर्वी रिलायन्समध्ये काम करायचा. तर शंकर बिरादार पूर्वी कुक्कुटपालनाचा व्यवसाय करायचा. यात आणखी मासे गळाला लागण्याची शक्यता असून त्यासाठी वेगवेगळी पथके कामाला लागली आहेत.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!