टॉप स्टोरी

कॉंग्रेसचे गोविंदपूरकर स्थायी समितीचे नूतन सभापती

20-06-2017 : 09:45:34 Topstory, 3565 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक गोविंदपूरकर यांची निवड झाली. त्यांनी भाजपाचे नितीश वाघमारे यांचा पराभव केला. लातूर महानगरपालिकेवर भाजपाचे राज्य असले तरी स्थायी समितीत दोन्ही पक्षांचे समान सदस्य असल्याने उमेदवारांच्या नावांच्या चिठ्ठ्या टाकून निवड करण्यात आली. त्यांच्या नावाची घोषणा होताच उपस्थित कॉंग्रेस सदस्यांनी पक्षाचा जयघोष केला.
लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला ३६ तर कॉंग्रेसला ३३ जागा मिळाल्या होत्या. या संख्याबळानुसार दोन्ही पक्षांचे प्रत्येकी आठ सदस्य स्थायी समितीसाठी निवडण्यात आले. महापौरांची आणि सदस्यांची निवड होऊन महिना लोटला तरी सभापतीची निवड होत नसल्याने बरीच ओरड झाली. अखेर १९ तारखेचा निवडीचा कार्यक्रम घोषित झाला. आज सकाळी दहाच्या सुमारास कॉंग्रेसच्या वतीने अशोक गोविंदपूरकर यांनी तर भाजपाच्या वतीने नितीश वाघमारे यांनी सभापतीपदासाठी अर्ज दाखल केले. पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी या निवडीचे नियम सभागृहाला सांगितले. दोन्हीकडे समान सदस्य असल्याने चिठ्ठी टाकून निवड करण्याबाबत माहिती दिली. सभागृहाने संमती देताच एका लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली. ती गोविंदपूरकर यांच्या नावाची निघाली. गोविंदपूरकर नवे सभापती म्हणून निवडून आल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी घोषित केले.
तीस वर्षानंतर मनपात मोठ्या पदावर संधी मिळाली. कचरा नियोजन, पाणीपुरवठा आणि नागरिकांच्या मुलभूत सुविधा या तीन बाबींवर आपण अधिक लक्ष केंद्रीत करणार आहोत. वन डे मॅच खेळायची आणि जनतेला कामांना प्राधान्य द्यायचे, दोन्हीकडे समान सदस्य असल्याने सामोपचाराने-सहकार्याने निर्णय घेऊ असे सांगून अशोक गोविंदपूरकर यांनी माध्यमांचेही आभार मानले.
गोविंदपूरकर यांना चिठ्ठी लकी!
अशोक गोविंदपूरकर यांच्या राजकीय कारकिर्दीत चिठ्ठी फलदायी ठरली आहे. २००६ साली लातूर जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत रमेश कराड आणि गोविंदपूरकर यांना समान मते मिळाली होती. यावेळी चिठ्ठी टाकून निवड करण्यात आली त्यात गोविंदपूरकरांना यश मिळाले. पुढे राज्य पतसंस्था फेडरेशनच्या उपाध्यक्षपदाच्या निवडीतही असाच अनुभव आला आणि आज मनपच्या स्थायी समिती स्भापतीपदाच्या निवडीतही चिठ्ठीच लकी ठरली. महापौर सुरेश पवारांना तात्या या नावाने संबोधले जाते, गोविंदपूरकरही याच नावाने प्रसिद्ध आहेत. मनपात आता दोन तात्यांचे राज्य आले अशी चर्चा उपस्थितात सुरु होती.
यावेळी उपायुक्त संभाजी वाघमारे, सतीश शिवणे, नगर सचिव सुनील चनवडे, सल्लाउद्दीन काझी, रमाकांत पिडगे, शैलेश गोजमगुंडे, दीपक सूळ, गौरव काथवटे, विक्रांत गोजमगुंडे, युनूस मोमीन, दीपाताई गिते, राजा मनियार, हनुमान जाकते, रवीशंकर जाधव, अहमदखां पठाण, पप्पू देशमुख, सचिन बंडापल्ले, संगीत रंदाळे, शैलेश स्वामी, अजय कोकाटे, शीतल मालू उपस्थित होते. महापौर सुरेश पवार, उपमहापौर देवीदास काळे यांनी गोविंदपूरकर यांचा सत्कार केला. मनपाच्या प्रांगणात कार्यकर्त्यांनी फटाके फोडले.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!