टॉप स्टोरी

गंजगोलाई झाली रिकामी, अतिक्रमणे साफ, पुन्हाचं काय?

29-07-2017 : 09:34:23 Topstory, 9426 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूर शहराचं भूषण समजली जाणारी गंजगोलाई अतिक्रमणांनी वेढली होती. या ठिकाणची अतिक्रमणे अनेकदा काढण्यात आली पण पुन्हा पुन्हा ती जागेवर आली. नवीन जिल्हाधिकार्‍यांनी लातुरची वाहतूक व्यवस्था ‘नीट’ करण्यासाठी महत्वाच्या ठिकाणची अतिक्रमणे काढण्याची मोहीम हाती घेतली आहे. परवा गांधी मार्केट साफ केल्यानंतर आज गंजगोलाईवर हातोडा फिरला. त्यापूर्वी तीन दिवस महानगरपालिकेने फिरत्या भोंग्यातून अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन वारंवार केले होते. काही ‘सुज्ञांनी’ कालपासूनच आपापला बाडबिस्तरा आवरण्यास सुरुवात केली होती. स्वत:हूनच अनेकजण बाजुला झाले होते. उरलेल्यांना आज जेसीबीचा झटका सहन करावा लागला. सह आयुक्त त्र्यंबक कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे. आज भल्या सकाळीच हे काम सुरु झालं. कालच या भागात अनेक जेसीबी, ट्रक, ट्रॅक्टर आणून उभे करण्यात आले होते. तीन दिवसांपासून हळूहळू या भागातील पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. या आधी राबवण्यात आलेल्या मोहीमेवेळी जसा गोंधळ झाला होता तसा यावेळी पहायला मिळाला नाही. मागच्या वेळी काही राजकीय नेत्यांनी गोलाईत येऊन विस्थापितांना पेटवण्याचं काम केलं होतं, चिथावणी देण्याचं काम केलं होतं, राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता.
आज एकाच वेळी तीन चार वेगवेगळ्या ठिकाणी जेसीबींनी काम सुरु केलं. मस्जीद रोडवरचीही अतिक्रमणे हटवण्यात आली. गंजगोलाईत तयार करण्यात आलेला गोल फुटपाथ आता पूर्ण रिकामा झाला आहे. मुख्य भागातील अतिक्रमणे हटवल्यानंतर आता गोलाईला जोडणार्‍या रस्त्यांवरची अतिक्रमणे हटवण्यात येणार आहेत. अतिक्रमणे हटतात पण पुन्हा वसतात. पुन्हा त्याच समस्यांना तोंड द्यावे लागते, प्रशासनाला वारंवार मोहिमा राबवाव्या लागतात. एकदा अतिक्रमणे निघाली की त्या ठिकाणी पुन्हा कुणी अतिक्रमण करण्याची हिम्मत करु नये यासाठी आवश्यक व्यवस्था केली जावी अशी मागणी जोर धरत आहे.
गोलाई राजकीय फायद्याचे ठिकाण
गंजगोलाईत विशिष्ट समाजाचे छोटे मोठे व्यवसाय चालतात. यात बहुतांश अतिक्रमणेच असतात. पण प्रत्येक निवडणुकीवेळी त्याचा फायदा घेतला गेला. काही नेत्यांनी या भागातील छोट्या व्यावसायिकांना परवाने देण्याचेही सोंग केले, फेरीवाला धोरण राबवण्याचे घोषित केले. काही जणांना परवानेही दिले पण पुढे सगळंच थांबलं. गंजगोलाईतील १६२ भाडेकरु टपरीधारकांचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे.
(गंजगोलाईचं हवाई चित्रण: शाम भट्टड)

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!