टॉप स्टोरी

पालकमंत्र्यांच्या घरावर वसुली मोर्चा, पोलिसांनी अडवला

11-08-2017 : 06:50:46 Topstory, 7915 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): मागच्या वर्षी सरकारने सोयाबीनला प्रति क्विंटल २०० रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. लातूर जिल्ह्यात ५८६२५ शेतकर्‍यांचे अनुदान बाकी आहे. वारंवार अर्ज विनंत्या करुनही ते मिळत नाही. इतकेच काय तर याबाबत विधीमंडळात एकजणही बोलत नाही. याच्या निषेधार्थ आज ऑगस्ट क्रांती दिनी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरावर शेतकर्‍यांचा ‘वसुली मोर्चा’ काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. सगळे शेतकरी मार्केट यार्डातील गौरीशंकर मंदिराजवळ जमले. मार्केट यार्डाला एक फेरी मारुन त्यांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पण मोठ्या संख्येने आलेल्या पोलिसांनी त्यांना यार्डाच्या चार क्रमांकाच्या गेटवरच अडवलं. याच ठिकाणी बसकन मारुन कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली. यात नदी, नाले आणि तलावाकाठच्या शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. या शेतकर्‍यांना प्रति क्विंटल २०० रुपये अनुदान देण्याचे घोषित केले होते. अशा ५८,५२६ शेतकर्‍यांचे सरकारकडे १९ कोटी ३९ लाख ४६ हजार ४२२ रुपये येणे बाकी आहे. सरकारचे आणि पालकमंत्र्यांचे लक्ष या प्रश्नाकडे वेधण्यासाठी हा वसुली मोर्चा काढायचा होता असे राजकुमार सस्तापुरे यांनी सांगितले. आमचं आंदोलन फसलं नाही, अजून १४ तारखेला रास्ता रोको करणार आहोत. १५ ऑगस्टला पालकमंत्र्यांना ध्वजारोहण करु देणार नाही. आम्हाला अटक केली यात दोषी पोलिस नाहीत तर पालकमंत्री आहेत. ही मंत्र्याची मस्ती आहे, त्यांनीच पोलिसांना सांगून आम्हाला रोखलं असा आरोप सस्तापुरे यांनी केला.
यावेळी राजकुमार सस्तापुरे, विमल आकनगिरे, विक्रमसिंह जाधव, रामराव मेळकुंदे, अनिल कोळी, तात्यासाहेब पाटील, प्रदीप शेंडगे, सतीश गाडेकर, बालाजी महाके, वसंत कंदगुळे, रतन इंद्राळे, काशिनाथ बनसोडे, शिवराज ढोरमारे, विशाल वाघमारे, अमर कांबळे, बजरंग बिराजदार आदी ५२ जणांना गांधी चौक पोलिसांनी ताब्यात घेतले. गांधी चौक आणि ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक, एक डीवायएसपी, पोलिस शिपाई आणि तीन व्हॅन मोर्चाच्या बंदोबस्तासाठी हजर होत्या.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!