टॉप स्टोरी

लाच प्रकरणी एसीबीच्या डीवायएसपीवर गुन्हा

25-08-2017 : 08:26:08 Topstory, 7487 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर आपल्याच लातूर विभागाच्या कार्यालयावर छापा घालण्याची वेळ आली. काल रात्री अनेक वाहनातून मुंबईसह इतर जिल्ह्यातील पथके आली. त्यांनी कार्यालय ताब्यात घेतले, तपासण्या केल्या. लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सुरेश शेटकर हे आरोपी असून त्यांनी मध्यस्थामार्फत आरटीओ विभागाच्या एका अधिकार्‍याकडून मध्यस्थामार्फत पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे उघड झाले आहे अशी माहिती नांदेड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक संजय लाटकर यांनी दिली. या मध्यस्थाला ताब्यात घेण्यात आले असून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २७७/२०१७ कलम ७, १२, १३ (ड) सह १२ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेटकर बाहेरगावी गेले असून त्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शेटकर यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळतेय पण अद्याप त्याला दुजोरा मिळू शकला नाही. आज दुसरा शनिवार असल्याने सुटी आहे. उद्या रविवार आहे. सोमवारपर्यंत शेटकर हजर झाले नाही तर त्यांना फरार म्हणून घोषित केले जाण्याची शक्यता आहे.
आपल्याविरुद्ध तक्रार आली आहे. कारवाई टाळायची असेल तर तीन लाख रुपये द्या असा निरोप शेटकर यांनी लातूर आरटीओ कार्यालयातील एका अधिकार्‍यास मध्यस्थामार्फत दिला होता. तडजोडीअंती प्रकरण लाखावर आले होते. आरटीओतील या अधिकार्‍याने मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची प्रत्यक्ष तक्रार केली होती. या तक्रारीवरुन या पथकांनी लातूर कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी केली. मध्यस्थाकडून पैसे जप्त केले. शेटकर यांच्या घरावरही छापा मारल्याचे समजते. त्याचा तपशील अद्याप मिळू शकला नाही.
दरम्यान शेटकर यांच्या जागी एमव्ही बेद्रे हे नवे डीवायएसपी लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागात आजच रुजू झाले आहेत.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!