टॉप स्टोरी

माजी नगराध्यक्ष रस्त्यावर, मनपा करवाढीविरोधात आंदोलन

10-10-2017 : 08:51:25 Topstory, 2959 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): लातूर महानगरपालिकेत सत्तांतर झाल्यापासून लातुरकरांचे ‘दिन बिघडले’ आहेत. आता मनपाने केलेल्या मालमत्ता करवाढीने लातुरकर, व्यापारी धास्तावले आहेत. रोज कुणी ना कुणी त्याचा विरोध करीत आहे. आज लातुरचे माजी नगराध्यक्ष, ज्येष्ठ विधिज्ञ, कॉंग्रेसचे नेते व्यंकट बेद्रे यांनी मनपाच्या दारात धरणे आंदोलन केले. बेद्रेही नगराध्यक्ष होते. त्यांनीही करवाढ, कर वसुली, नवीन करांचे प्रस्ताव हाताळले आहेत. आताची करवाढ आणि आपल्या काळातील कर पद्धती यात काय फरक आहे, हा कर किती न्याय्य आहे असा प्रश्न आम्ही केला असता, आजची कावाढ नियमबाह्य आहे, फेरमुल्यांकनाची करवाढीला सर्वसाधारण सभेने आणि स्थायी समितीने मान्यता दिलेली नाही. भाडेमूल्य ठरवताना निकषांची अमलबजावणी झाली नाही, सामन्य माणसांची करवाढ पाच ते दहापट झाली आहे. करवाढ निकषांनुसार करावी, आज आम्ही धरणे आंदोलन करतोय याला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला.
या आंदोलनावेळी महापौर सुरेश पवार आणि उप महापौर देवीदास काळे आले. त्यांनी निवेदन स्विकारले. करवाढ करताना, भाडेमूल्य निर्धारीत करताना बाजार, रहिवासी, शाळा महाविद्यालयांचा परिसर याचा विचार करायला हवा, मनपाकडून गोलाईत लावले जाणारे भाडे दयानंद महाविद्यालयामागे लावता येणार नाही. असे आमचे म्हणणे आहे. सर्वसाधारण सभेमध्ये भाडेवाढीला मंजुरी घ्यावी अशी मागणी आम्ही केली ती महापौरांनी मान्य केली. आमच्या काळात आम्ही जाचक करवाढ कधीच केली नव्हती पण मनपा झाल्यानंतर लोकप्रतिनिधींच्या अधिकारांचं उल्लंघन करुन अधिकारी करीत आहे, ते नियमबाह्य आहे. लातुरच्या विकासात सामान्य माणसाचाही सहभाग आहे. त्याची पायमल्ली होऊ नये असेही अ‍ॅड. बेद्रे म्हणाले. लातुरकरांना का भरताना कसलीही अडचण होऊ देणार नाही. लातुरकर म्हणतील त्याप्रमाणंच काम करायचं आहे असं यावेळी महापौर सुरेश पवार म्हणाले.
यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे, मनोहरराव गोमारे, उदय गवारे, लक्ष्मीकांत मंठाळे, डॉ. बालाजी साळुंके, सज्जाद पठाण, प्रदीप गंगणे, अनंत लांडगे, अशोक कांबळे उपस्थित होते. मनपाचे स्विकृत सदस्य प्रकाश पाठक यांचाही या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!