टॉप स्टोरी

कॉंग्रेसचे ३१ सरपंच, भाजपाचे १५२ सदस्य, थेट सरपंच

10-10-2017 : 08:50:47 Topstory, 5091 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत थेट सरपंच निवडले गेले. ४३ पैकी १२ ठिकाणी भाजपाचे तर ३१ गावात कॉंग्रेसचे सरपंच निवडले गेल्याची माहिती मिळते आहे. सरपंच निवडीत कॉंग्रेसने बाजी मारली पण ४३ ग्रामपंचायतींच्या २५२ सदस्यांपैकी १५२ सदस्य भाजपाचे निवडून आले असा दावा करण्यात आला. ग्रामीण मतदारसंघातील या निवडणुकीसाठी आ. त्र्यंबक भिसे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. ती कामी आली असे त्यांनी सांगितले. जनतेतून थेट सरपंच निवडण्याची ही पद्धती चांगली आहे. याचा गावालाही चांगला लाभ होईल असे पिंपरी अंबा येथील कॉंग्रेस प्रणित ग्रामविकास परिवर्तन पॅनलचे प्रमुख जयचंद भिसे यांनी सांगितले. पिंपरीच्या सरपंचपदी सौ पूनम श्रीकांत भिसे निवडून आल्या आहेत. जसजसे निकाल घोषित होत होते तसतसे मतमोजणी केंद्राबाहेरचा जल्लोष वाढत होता. लातुरात फार वेळ न दवडता आपापल्या गावात जाऊन आनंद साजरा करण्याकडे सगळ्यांचा कल होता. त्यामुळे मतमोजणी केंद्रासमोरील गर्दी लवकर हटत गेली, पोलिसांना फारसे काम लागले नाही.
दुपारी एक वाजेपर्यंत लातुरातील मतमोजणी संपली पण पुढील सोपस्काराला बराच वेळ लागला. निकाल घोषित झाल्यानंतर अधिकारी आणि काही कर्मचारी वगळता फारसं कुणी उपस्थित नव्हतं. निवडणूक निकालाचा अधिकृत कागद बाहेर यायला सात वाजले. लातूर तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक झाली. यात ७६ टक्के मतदान झाले. एकूण ९४ हजार ३१२ मतदारांपैकी ७१ हजार ६७९ जणांनी मतदान केले. जिल्ह्यात ३५१ ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. यापैकी १८ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. या निवडणुकीसाठी ११४५ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. १५१५ पोलिस तैनात करण्यात आले होते. ७२ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली होती.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!