व्हिडिओ न्यूज

महापौरांना जागे करण्याचा प्रयत्न, खुर्ची आणि केबिनला हार!

2017-06-17 19:00:02 Mainvideo, 24887 Views 0 Comments

अमृत योजनेचे काम संथगतीने, ठेकेदारावर होणार कारवाई!
लातूर (आलानेप्र): लातुरला आठवड्यातून दोनवेळा पाणी देण्याचं आश्वासन लातूर महापालिकेतले विकास पुरुष विसरले असले तरी विरोधी पक्षनेते दीपक सूळ यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा करीत आज प्रशासनाला धारेवर धरले. महापौर लातुरच्या कामांकडे लक्ष देत नसल्याने त्यांच्या केबिनला आणि खुर्चीला हार घालून महापौरांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
आज विरोधी पक्षनेते दीपक सूळ, विष्णू साबदे, पुनित पाटील, मोमीन युनूस, सचिन बंडापल्ले, सय्यद इम्रान, सचिन मस्के, गौरव काथवटे, कांचन अजनीकर, महेश काळे आणि विनोद खटके यांनी मनपा प्रशासनाला बिघडलेला पाणी पुरवठा, आठवड्यातून दोनवेळा पाणी देण्याचे वचन आणि शहरातील नाले सफाई आदी कामांबाबत जाब विचारला. अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने देऊनही महापौरांचे कामांकडे लक्ष नाही, शहरात अनेक ठिकाणी तुंबते, अनेकांच्या घरात जाते यावर उपाय योजना केली जात नाही. महापौर बाहेरगावी फिरत असतात असा आरोप विरोधी पक्षनेते दीपक सूळ यांनी केला. त्यांच्या अनुपस्थितीत खुर्चीला हार घातला. यानंतर या आंदोलकांनी उपायुक्त संभाजी वाघमारे यांना घेरले. पाणी पुरवठा, अमृत योजनेची कामे आणि शहरातील नाले सफाईबाबत जाब विचारला.
लातूर शहरामध्ये अमृत योजनेअंतर्गत वितरण व्यवस्थेची पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे. लातूर शहराला चार दिवसांना पाणी पुरवठा करण्याकरिता जीवन प्राधिकरण विभागाकडे १५ कामे तातडीने करण्याबाबत कळवण्यात आले आहे. या कामांसाठी ०३ महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्राचे काम चालू आहे. हे काम चार दिवसात पूर्ण होईल. ही सर्व कामे झाल्यानंतर लातुरला आठवड्यात दोनवेळा पाणी पुरवठा करणे शक्य होणार आहे. अमृत योजनेचे काम संथगतीने सुरु आहे. याबाबत ठेकेदाराला नोटीस देण्यात आली आहे. प्राधान्याने करायची कामे वेळेत पूर्ण न केल्यास ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती उपायुक्त संभाजी वाघमारे यांनी दिली.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!