व्हिडिओ न्यूज

निसर्ग समृद्ध असतानाही इंधनाच्या बाबतीत पळत्याच्या मागे!: कार्यशाळा

2017-08-10 18:54:33 Mainvideo, 28720 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): समृद्ध निसर्ग व खनिज संपत्त्तीची मुबलक उपलब्धी असतांनाही आपले समाज बांधव इंधनाच्या बाबतीत हातचे सोडून पळत्याच्या मागे लागण्याचे काम करतात. आजघडीला समाजात ज्याप्रमाणे अगदी सहजगत्या भ्रमणध्वनीचा वापर केला जातो, त्याच धर्तीवर बायोगॅसचा वापर व्हायला हवा, अशी अपेक्षा सिंधुदुर्गच्या भगीरथ ग्राम विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी व्यक्त केली. लातूर येथील मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख सभागृहात विश्व जैव इंधन दिवसाचे औचित्य साधून पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय व नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटी दिल्ली यांच्या व जलयुक्त लातूरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत ‘ग्रामीण कचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती व वापर' या विषयावर डॉ. देवधर बोलत होते. या कार्यशाळेचे उद्घाटन लातूर शहर महानगरपालिकेचे महापौर सुरेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ललितकुमार शहा होते. यावेळी डॉ. अशोकराव कुकडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, नॅचरल शुगरचे बीबी ठोंबरे, अ‍ॅड. मनोहरराव गोमारे, अ‍ॅड. त्र्यंबकदास झंवर, महाराष्ट्र बायो फर्टिलायझर्सचे कार्यकारी संचालक निलेश ठक्कर, मकरंद जाधव, भारत पेट्रोलियमचे सोलापूर विभागाचे अधिकारी दळवी, नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे उपस्थित होते. यावेळी विश्व जैव इंधन दिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेतील तीन यशस्वी स्पर्धकांना पुरस्काराने गौरविण्यात आले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणारे केदार खमितकर, सायकल रॅलीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणारे शिरीष खंदाडे, प्रा. संदीप जगदाळे यांचा सन्मान करण्यात आला.
महापौर सुरेश पवार यांनी उद्घाटनपर भाषणात जैव इंधनाकडे वळणे काळाची गरज असल्याचे सांगितले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, ललितकुमार शहा, भारत पेट्रोलियमचे दळवी यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी बोलताना डॉ. अशोकराव कुकडे यांनी जलयुक्त लातूरच्या माध्यमातून लातुरात विश्व इंधन दिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा सर्वांच्या सहकार्याने अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. समाजात निर्माण होणारे सर्व प्रश्न समाजानेच एकत्रित येऊन सोडवले पाहिजेत. लातूरच्या महापौरांनी आपले लातूर शहर कचरामुक्त करण्याच्या दृष्टीने याबाबतीत गांभीर्याने घ्यावे, याकामी जलयुक्त लातूर त्यांच्या सोबत राहील असे सांगितले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. संदीप जगदाळे, शिवदास मिटकरी यांनी तर प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मकरंद जाधव यांनी केले.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!