व्हिडिओ न्यूज

लोकनेते विलासरावांच्या स्मृतीदिनानिमित्त आरोग्य महाशिबीर

2017-08-12 19:04:03 Mainvideo, 31383 Views 0 Comments

१४ तारखेला १५० हून अधिक रुग्णालयात तपासणी, उपचार
लातूर (आलानेप्र): राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त १४ ऑगस्ट २०१७ रोजी लातूर शहरात १५० पेक्षा अधिक रुग्णालयात आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य शिबीरात अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच दंत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून गरजू रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहेत अशी माहिती आमदार अमित विलासराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी नेहमीच प्राथमिकता देऊन त्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण यावेत म्हणून ज्यांनी आयुष्यभर जनसेवा केली ते लोकनेते विलासराव देशमुख यांचा स्मृतीदिन लोकोपयोगी उपक्रमानेच साजरा व्हावा हा उद्देश ठेवून विलासराव देशमुख फाऊंडेशन तसेच इंडियन मेडीकल असोसिएशन, निमा, दंत वैद्यकीय आणि होमिओपॅथी या वैद्यकीय क्षेत्रातील संघटनांच्या संयुक्त विद्यामाने सोमवार १४ ऑगस्ट २०१७ रोजी लातूर शहरात आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबीरांतर्गत लातूर शहरातील १५० खाजगी रुग्णालयात रुग्णांची तपासणी व त्यानंतर आवश्यकतेप्रमाणे त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. या शिबीराचा सर्व वयोगटातील रूग्णांना लाभ होणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या उपक्रमात अॅलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी तसेच दंत वैद्यकीय क्षेत्रातील सर्व नामवंत तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होत आहेत. शिबीरात साथीच्या रोगापासून हृदय रोग, कॅन्सर आदी सारख्या महागडे उपचार असलेल्या रूग्णांचीही तपासणी करुन त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहेत. या शिबीर काळात अनेक रुग्णालयात अॅन्जीओग्राफीपासून सिटीस्कॅन, एम.आर.आय. सारख्या तपासण्याही मोफत किंवा नाममात्र दरात करण्यात येणार आहेत.
लोकनेत्याच्या स्मरणार्थ एकाच दिवशी एकाच शहरात १५० पेक्षा अधिक ठिकाणी आयोजित होणारे हे आरोग्य शिबीर हा एकमेव सामाजिक उपक्रम असावा. विलासराव देशमुख फाऊंडेशन, इंडियन मेडीकल असोसीएशन, निमा असोसीएशन, दंत वैद्यकीय आणि होमिओपॅथी असोसिएशन यांच्या मार्फत मागील ०३ वर्षापासून आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येते. २०१४ साली ५००० रुग्णांनी, २०१५ साली ७५०० रुग्णांनी तर २०१६ या वर्षी १०००० रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला. यावर्षीही लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजीत करण्यात आलेल्या या आरोग्य शिबीरात जवळपास १५ ते २० हजार रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात येतील.
या आरोग्य शिबीरात सहभागी झालेल्या वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत तज्ञ डॉक्टरांनी आपल्या रुग्णालयात मोफत आरोग्य शिबीराची तयारी केली असून रुग्णांची नोंदणीही सुरु केली आहे. या आरोग्य शिबीराच्या लातूर शहर व परिसरातील जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन आमदार अमित विलासराव देशमुख, संयोजक तथा इंडियन मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.अशोक आरदवाड, सचिव डॉ.अभय कदम, डॉ. ओमप्रकाश भोसले, निमाचे अध्यक्ष डॉ. विनोद कोराळे, इंडीयन डेंटल असोसिएशनचे डॉ. नितीन शितोळे, डॉ. सतीश बिराजदार आणि होमिओपॅथीक असोसिएशनचे डॉ. संजय गव्हाणे, डॉ.दरक यांच्यासह सहभागी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेला डॉक्टर्स असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक आरदवाड, सचिव डॉ. अभय कदम, डॉ. ओमप्रकाश भोसले, निमाचे अध्यक्ष डॉ. विनोद कोराळे, इंडीयन डेंटल असोसिएशनचे डॉ. नितीन शितोळे, डॉ. सतीश बिराजदार, डॉ. पवन लड्डा, डॉ. कल्याण बरमदे, डॉ.भिसे, डॉ. चित्ते, डॉ. मन्मथ भातांब्रे, डॉ. विनाद कोठाळे, डॉ.सुरेखा काळे,डॉ.अर्चना कोंबडे, डॉ. रमेश भऱ्हाडे, डॉ. जोगदंड, ओमप्रकाश सोवले, मनोज देशमुख उपस्थित होते.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!