व्हिडिओ न्यूज

का आले मनपात वानर? केली कशाची तपासणी? तासभर केला मुक्काम!

2017-10-12 20:38:58 Mainvideo, 127 Views 0 Comments

लातूर (आलानेप्र): काल दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक वानर (काळ्या तोंडाचे) महानगरपालिका प्रांगणात दाखल झाले. अंगापिंडाने मजबूत या वानराने मनपाच्या परिसरात बंद पडलेल्या-भंगारातल्या जीपच्या बॉनेटवर काही काळ आराम केला. या गाडीच्या काचेत अनेकदा आपली प्रतिमा न्याहाळली. या ठिकाणी काहीजणांनी त्याला खायला कांदे देण्याचा प्रयत्न केला. त्याने ढुंकूनही पाहिले नाही. तिथून तो जमिनीवर आला. कुणीतरी मगात प्यायला पाणी दिले. पोटभर पाणी पिऊन तो मनपाच्या नाना नानी पार्ककडच्या भिंतीवर जाऊन बसला. इथेही त्याला खायला चिकू दिले गेले. त्याने आनंदाने खाल्ले. पुढे तो नाना नानी पार्कच्या दिशेने रवाना झाला आणि काही वेळातच विधिज्ञ अण्णाराव पाटील आणि त्यांच्या महाराष्ट्र विकास आघाडीचा मोर्चा दाखल झाला.....
मनपातच कसे आले हे वानर? त्याला कुणी पाठवले होते? त्याने कुणासाठी केली रेकी? अधिकार्‍यांची आणि कर्मचार्‍यांची प्रेझेंटी तर चेक केली नाही ना? असे असेल तर तो कुणाला रिपोर्ट करेल? आपल्या पेक्षा कुणी बुद्धीमान आणि कार्यकुशल सापडतं का याचा अभ्यास त्याने केला असेल का? असे नाना प्रश्न राजकीय वर्तुळातून विचारले जात होते.
या वानराला इकडे काय हवे होते याचा अंदाज मात्र अखेरपर्यंत आला नाही. त्याने कुणालाही त्रास दिला नाही. ते शांतपणे इकडे तिकडे वावरत होते म्हणून कुणी त्याच्या वाटेलाही गेले नाही. पनपात कामे घेऊन गेलेली जनता या वानराच्या मागे असल्याने, त्यांचं लक्ष वानराकडे केंद्रीत झाल्याने कार्यालयात बसलेल्या कर्मचार्‍यांना मात्र तास दोन तास आराम मिळाला. प्रचंड काम करणार्‍या मनपातील अधिकारी-कर्मचार्‍यांवर त्याने उपकारच केले. एरवी आपण भूतदया-प्राणीदया दाखवतो. या वानराने मात्र मानवदया दाखवली!
वानरामुळे डॉक्टर जखमी
पानगावात वानरांनी धुमाकूळ घातलाय, अनेकांना चावा घेतला, महिलांना थोबाडीत मारले. परवा खर्डेकर स्टॉप परिसरातही ते आले होते. लोक त्याला दगड मारीत होते, हुसकावण्याचा प्रयत्न करीत होते. बिथरलेले हे वानर सैरावैरा पळत होते. त्यामुळे एक मानसोपचार तज्ञ डॉक्टर स्कूटरवरुन खाली पडले, त्यांच्या पायाला फ्रॅक्चरही झाले होते. त्यापूर्वी या अशा दोन वानरांनी सरस्वती कॉलनीत मोठा गोंधळ घातला होता. आता ही वनरं या भागातून गायब झाली आहेत. ती अनेकांना उड्डाण पुलावर अधून मधून दिसत असतात.

Comments


SPONSORS

नेटवाणी... Download

Downlaod Netwani Application

Netwani, a leading news application on Android mobile, Download & Be update!