HOME   लातूर न्यूज

जिल्हा बँकेवर प्रशासक नेमण्याची भाजपाची मागणी

पीक विम्याच्या बाबतीत जिल्हा बॅंकेने हलगर्जीपणा केल्याचा आरोप


जिल्हा बँकेवर प्रशासक नेमण्याची भाजपाची मागणी

लातूर: पीक विम्याच्या बाबतीत तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने हलगर्जीपणा केला. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रक्कम पेरणीपूर्वी मिळू शकली नाही. यामुळे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून या बँकेवर प्रशासक नेमावा अशी मागणी भाजपाच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
मागील वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या पिकाला विम्याचे संरक्षण असावे म्हणून विमा रकमेचा हप्ता भरला. शेतकऱ्यांनी पैसे भरल्यानंतर शासन व विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना मंजूर असणारी विम्याची रक्कम पेरणीपूर्वी मिळावी यासाठी व्यवस्था करण्यात आली. त्यानुसार राष्ट्रीयकृत बँकांनी तांत्रिक बाबींची वेळेवर पूर्तता केली. परंतु जिल्हा बँकेने मात्र आवश्यक तांत्रिक बाबी वेळेत पूर्ण केल्या नाहीत. यामुळे विमा रक्कम मंजूर असूनही शेतकऱ्यांना पेरणीपूर्वी विमा रक्कम मिळू शकली नाही. जिल्हा बँकेने मुद्दामहून तांत्रिक बाबींची पूर्तता न करून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले आहे. यामुळे जिल्हा बँक बरखास्त करून या बँकेवर प्रशासक नेमावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ निडवदे यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे सदस्य आणि भाजपा पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


Comments

Top