लातूर: विविध नागरी सुविधा पुरविण्यासोबतच विकास कामे गतीने करण्यासाठी प्रयत्न करावेत व ही कामे करताना कोणत्याही प्रकारची कुचराई करु नये, असे निर्देश पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री निलंगेकर बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मिलिंद लातूरे, उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉं विपीन इटनकर, महापौर सुरेश पवार, मनपा आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे सभापती संजय दोरवे, प्रकाश देशमुख, यांच्यासह जिल्हा परिषद व महापालिकेच्या सर्व विभागप्रमुखांची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री म्हणाले की, मनपाकडे घरकुल योजनेसाठी जे प्रस्ताव दाखल झाले आहेत ते तातडीने निकाली काढावेत. तसेच अमृत योजनेअंतर्गत कामे करण्यासाठी दुसरा टप्पा लवकरात लवकर मंजूर करून घेऊन कामाला सुरुवात करावी. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी निविदा प्रक्रिया तातडीने राबवून या प्रकल्पाला आवश्यक जमीन घेण्यासाठी पाठपुरावा करावा असे त्यांनी सूचित केले.
शहर हद्दीतील ग्रीन बेल्टचा विकास करावा तसेच गंजगोलाईचे सुशोभीकरण करून शताब्दीनिमित्त गोलाई महोत्सव आयोजित करण्यासाठी समित्यांची स्थापना करून लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना त्यांनी केल्या. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी नवीन स्त्रोत शोधावेत असेही ते म्हणाले. शहरातील स्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करून या कामात सुधारणा करण्याचे निर्देश त्यांनी दिले . शहरात ४० ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्यासाठी पाऊले उचलावीत. प्लास्टिक बंदी, फेरीवाला व पार्किंग धोरण यासाठी योग्य कारवाई करून अमलबजावणी करावी. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा. नाट्यगृह, सोलार, एलबीटी , आकृतिबंध याचा पाठपुरावा मंत्रालयात करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी तसेच कुठल्याही कामात अडचण आली तर थेट आपल्याशी संपर्क साधावा अशा सूचनाही निलंगेकर यांनी केल्या.
जिल्हा परिषदेच्या घरकुल, आरोग्य तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीसह सोलार प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव दाखल करावेत शाळा, अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी प्रस्ताव द्यावेत, प्रवेश वाढ तसेच इंग्रजी शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांसाठी एकच पॅटर्न असावा. विद्यार्थ्यांची बौद्धिक, शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी वर्षभराचे नियोजन तयार ठेवावे, असे ते म्हणाले. दिव्यांगाबाबत बोलताना दिव्यांगांची यादी दोन महिन्यात पूर्ण करून नोव्हेंबर अखेर त्यांना साहित्य वाटप करावे. जिल्हा चुल मुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करावेत. उज्वला योजनेअंतर्गत सर्वेक्षण करून गरजूंना गॅस कनेक्शन मिळवून द्यावे. वृक्ष लागवड करावी. प्रत्येक घरात वृक्ष पोचविण्याची तरतूद करावी यासह शहरातील प्रत्येक घरात नळ जोडणी द्यावी. प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधींनी समन्वयाने ही कामे पूर्ण करून घ्यावीत. या कामात कुचराई करू नये असेही पालकमंत्री म्हणाले.
Comments